पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत असं या आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याने आईला एक सुसाइड ऑडिओ पाठवत आपली अखेरची इच्छा व्यक्त केली.

“मम्मी, मी मोबाईल फोडून टाकतो, पुरावा राहणार नाही. मला मरायचं आहे… मी विष प्यायलो आहे… लोकेशन पाठवलं आहे… माझा मृतदेह घेऊन जा” – अशा शब्दांत त्याने आईला निरोप दिला. ही धक्कादायक घटना १७ जून रोजी घडली. संजयकुमारच्या बेपत्ताची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अखेर शनिवारी (२१ जून) त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळून आला. मृतदेहाजवळच विषारी औषधाची बाटली सापडली असून, प्राथमिक तपासात आणि शवविच्छेदन अहवालातही विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
बहिणींसाठी शेवटचा संदेश
संजयकुमारचे कुटुंब त्याच्यासोबत पिंपरी-चिंचवडमध्ये राहत होते. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणी आहेत. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्याने आपल्या बहिणींबद्दल अतिशय प्रेम आणि काळजी व्यक्त केली आहे. “माझ्या बहिणींना त्रास देऊ नका. त्यांचं चांगलं पालनपोषण करा. त्या सुशिक्षित व्हाव्यात आणि पुढे जाव्यात,” अशी मार्मिक विनंती त्याने आई-वडिलांना केली आहे.

ऑडिओ-व्हिडिओ क्लिपमधून व्यक्त झालं नैराश्य
पोलिसांच्या हाती आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप लागले आहेत. यातून संजयकुमार गंभीर नैराश्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, त्याने विषारी औषध ऑनलाइन मागवले होते, आणि नंतर हे टोकाचं पाऊल उचललं.
त्याच्या आवाजातला उद्विग्नपणा आणि हताश भावनांनी अनेकांच्या मनाला चटका लावला आहे. “ज्याप्रमाणे इतर लोक मरतात, तसा मीही मरेन… काही बोलायचं नाही… मला काही नकोय… केवळ माझ्या बहिणींची काळजी आहे… माझं आयुष्य काही कामाचं राहिलं नाही,” अशी आत्महत्येपूर्वीची त्याची भावना क्लिपमधून समोर आली आहे.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा तपास देहूरोड पोलीस करत असून, सुसाइड क्लिप आणि मृतदेहाजवळ मिळालेल्या वस्तूंच्या आधारे अधिक तपशील घेतले जात आहेत. तरुणाच्या या पावलामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







