पुणे : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुण्यातील नारायणगावमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी केली आहे. परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची कामं पुण्यातील नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नारायणगावातील एका इमारतीत काम सुरू असून या प्रकरणात 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपची कामे पुण्याच्या नारायणगाव शहरातील एका इमारतीत सुरु होते. संपूर्ण इमारत महादेव अॅपसाठी वापरत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी नारायणगाव येथील एकाबड्या व्यापाऱ्यासह कुटुंबातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु होती. त्यावेळी पोलिसांनी छापेमारी करुन 70 ते 80 जणांना ताब्यात घेतले. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीच्या (ED) विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपवर बंदी घातली आहे. या अगोदर महादेव बेटींग अॅप प्रकरणात अनेक कलाकारांची नावे देखील पुढे आली होती. अशातच आता मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी सुरु असल्यामुळे केंद्र सरकारकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
असा झाला उलघडा
महादेव बुक अॅपचा संस्थापक सौरभ चंद्राकर याने मित्र रवी उप्पलसोबत महादेव ऑनलाईन अॅप सुरु केले. या अॅपवर ऑनलाइन बेटिंग केली जाते. सौरभ चंद्रकारचा फेब्रुवारी 2023 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला होता. या विवाहसोहळ्याला अनेक मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या शाही विवाह सोहळ्यामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या रडारवर आले आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघडकीस आलं.