लोणी काळभोर : बंगळुरू-मुंबई महामार्गावरील खेडशिवापूर टोलनाक्याजवळ फक्त गोवा राज्यात विक्री करण्यासाठी परवानगी असलेल्या विदेशी दारूचा तब्बल ९३ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला.
विपुल देविलाल नट (वय ३२ रा. देविलालजी नट, व्हिलेज पोस्ट रोहनिया, तहसिल गांगडतलाई, रोहनिया, बांसवाडा, राजस्थान) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की, पिगॉट, चॅपमॅन, बारडेज गोवा या विदेशी मद्याची वाहतूक करत असल्याचे तपासात दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गोवानिर्मीत विदेशी मद्याची विक्री करण्यासाठी गोव्यातून बंगळुरू-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरुन विक्रीसाठी एक आयशर कंपनीचा सहा चाकी टॅम्पो येणार असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १९) रात्री पहाटेच्या वेळी खेड शिवापूर टोलनाक्यावर पथकाने सापळा रचला व संशयास्पद ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता ट्रकचालकाने वाहनामध्ये औषधे आहेत, असे सांगून त्याबाबतची औषधांची बिल टीपी, टॅक्स इन्व्हाईस व ई-वे बिल अशी कागदपत्रे दाखविली. कंटेनरचे कुलूप उघडून पाहिले असता कंटेनरमध्ये एकुण ९५० बॉक्समध्ये मद्याने भरलेल्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की या मद्याच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकुण ४५ हजार ६०० सिलबंद बाटल्यांचा साठा मिळून आला. या बाटल्यांवरील लेबलांची पाहणी केली असता त्यावर रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की व उत्पादक कंपनीचे नाव पिगॉट चॅपमॅन अँड कंपनी कोलवेल इंडस्ट्रीयल इस्टेट, बारडेज गोवा असे छापलेले दिसून आले.
ट्रकचालकाकडे ना कोणताही वाहतूक पास, ना परवाना
या मद्याबाबत ट्रकचालकाकडे मद्य वाहतुकीबाबतचा कोणताही वाहतूक पास अथवा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याने औषधांच्या नावाखाली गोवा राज्यात निर्मीत विदेशी मद्याची वाहतूक महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचे उद्देशाने करुन फसवणूक केल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए. सी. फडतरे, तसेच जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल थोरात, पी.टी. कदम भरत नेमाडे व जवान अमोल दळवी यांनी सहभाग घेतला असून, गुन्हयाचा पुढील तपास विभागीय भरारी पथकाचे दु, निरीक्षक ए. बी. पाटील हे करत आहे.