पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पाठलाग करुन शिरवळजवळ त्याला ताब्यात घेतले. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 3 पिस्तूल जप्त करण्यात आलेत. ज्या पिस्तूलमधून शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता, ती पिस्तूल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या दोन दुचाकी देखील ताब्यात घेतल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, यातील काजी या आरोपीचे शरद मोहोळशी जमिनीवरुन आणि आर्थिक गोष्टीवरुन वाद झाले होते. त्याताच सूड घेण्यासाठी शरद मोहोळ याला मारण्याचा कट रचण्यात आला होता.
साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा पळून जात असताना शिरवळमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. शरद मोहोळ प्रकरणात सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. शरद मोहोळ प्रकरणातल एका आरोपीचं नाव सुरुवातीला निष्पन्न झालं होतं. त्यानंतर 8 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.