महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे (दौंड): पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच अवकाळी पावसाने आपले उग्र रूप धारण केले आहे. या काळात दौंड तालुक्यातील विविध गावात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. आधीच उष्णतेने व्याकुळ झालेल्या नागरिकांना विजेच्या या लपंडावाचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसाने अचानक थैमान घातल्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांची चांगलीच झोप उडाली आहे. अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे जीर्ण झालेले खांब तसेच विद्युत वाहिनीवर येणार्या झाडांच्या फांद्या ही सर्वांची डोकेदुखी बनली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून देऊळगाव राजे व परिसरात अवकाळी वादळी वारे व पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जीर्ण झालेले विद्युत खांब कोसळत आहेत. तर ठीक ठिकाणी विद्युत वाहिनीवर येणार्या झाडांच्या फांद्या पडतात. त्यामुळे वीज वाहिनी तुटते. त्याचबरोबर इतर अनेक समस्यांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वीज वाहिनीवर असणारी झाडे तोडण्यास परवानगी नसल्यामुळे वीज वाहिनीवर येणार्या झाडांच्या फांद्या तोडून वीज पुरवठा सुरु करण्यासाठी कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनी झाडांच्या फांद्या तोडून वीज पुरवठा सुरळीत कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करते. एका बाजूला विजेचे वाजवी दर लावले आहेत. वीज वापर, वीज कर, वीज भाडे, मीटर भाडे असे विविध कर लावून ग्राहकावर लाईट बिल आकारण्यात येते. ग्राहक ते वेळोवेळी भरतात. मात्र, ग्राहकांना चांगली सेवा देणे हे शासनाचेही कर्तव्य आहे. सध्या देऊळगाव राजे तसेच परिसरातील विविध गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकरी वर्ग तसेच विजेवर चालणारे झेरॉक्स, पिठ चिक्की, हॉटेल व्यवसायिक, दूध संकलन केंद्र यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
दौंड ते देऊळगाव राजे उपकेंद्राच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीची देखभाल व दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. जेणेकरून उच्चदाब वाहिनी बंद पडणार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा सुरू राहील, यांची काळजी महावितरणने घेणे गरजेचे आहे.