उरुळी कांचन, (पुणे) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उरुळी कांचन शाखेने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकातील एका बड्या नामांकित ‘स्वीट होम’वर छापा टाकला आहे. ‘स्वीट होम’वर छापा टाकून सुमारे दोन लाखांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी ‘स्वीट होम’ चालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे उरुळी कांचनसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दशरथ वसंत कुंजीर, उरूळी कांचन (ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ‘स्वीट होम’ चालकाचे नाव आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन हद्दीतील स्वीट होमवर महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता अंकुश शिवाजी मोरे, (वय-30, उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ कुंजीर यांचे पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकात कांचन स्वीट होम नावाने दुकान आहे. तर अंकुश मोरे हे महावितरणाच्या उरुळी कांचन शाखेत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. उरुळी कांचन शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील ग्राहकांकडून वीज बिल थकबाकी वसुली करणे, वीजचोरी शोधणे, पी. डी. ग्राहकांकडून थकबाकी वसुली करण्याचे आदेश महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिले होते.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौक परिसरात मोरे व त्यांचे सहकारी वीज बिल वसुली करत होते. यावेळी दशरथ कुंजीर यांनी 12 मार्च 2024 पर्यंत 1 लाख 92 हजार 820 रुपये किमतीची 8 हजार 870 युनिटची वीज चोरी केल्याचे निष्पण झाले आहे. यावेळी आलेले बिल कुंजीर यांनी स्वीकारले असल्याची माहिती मोरे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, दशरथ कुंजीर यांनी या अगोदर ही चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच वीज चोरी केल्याने यामध्ये तडजोड नसल्याने सदर घटनेचा पंचनामा, स्थळ तपासणी अहवाल, असेसमेंट शीट, वीजचोरीचे बिल, घटनास्थळाचे फोटो इत्यादी तत्सम कागदपत्रे जोडली असून याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंजीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.