पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यासह सहाजणांविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण हा पुण्यातील डॉक्टर आहे.
आयसिस या दहशतवादी संघटनेचा प्रचार करणाऱ्या दहशतवाद्यांना एनआयए आणि एटीएसने अटक केली होती. दोन महिन्यांपूर्वी एनआयएच्या पथकाने पुणे, मुंबई, ठाणे परिसरात कारवाई करुन दहशतवाद्यांना अटक केली होती. पुणे आणि मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरात बाँम्बस्फोट घडविण्याचा कट आरोपींनी रचल्याचे तपासात उघड झाले होते. ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला, लालाभाई शर्जील शेख, आकीफ अतीक नाचन, जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा, डॉ. अदनान अली सरकार यांना अटक केली आहे. गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयात सहा दहशतवाद्यांविरुद्ध एनआयएने आरोपपत्र दाखल केले.
पुण्यातील कोंढवा भागात राहणारा डॉ. सरकार हा हडपसरमधील एका नामांकित रुग्णालयात काम करत होता. डॉ. सरकार आयसिसचा प्रसार करण्यात गुंतल्याचे तपासात उघडकीस आले होते. तसेच झुल्फिकार अली बडोदावाला आणि आकीफ अतीक नाचन यांनी पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटके तयार करणे व बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स ॲक्ट), तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.