बारामती : ‘मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असं दिसतंय की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल. मला असं दिसतंय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे, असे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांनी महायुतीला बहुमत मिळण्याचा जो दावा केला होता, त्याची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावून प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधासभेच्या सर्व 288 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राचे भवितव्य नागरिकांच्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 67 टक्के मतदान झाले होते. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यावेळी मतदानाची टक्केवारी 75 ते 80 टक्के इतकी होती. महाराष्ट्राने मतदानाच्या टक्केवारीत मागे राहणे, हे अशोभनीय आहे. म्हणून माझं आवाहन आहे, मतदानाचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीत बजावला पाहिजे. तुम्हाला जो राजकीय पक्ष आणि व्यक्ती योग्य वाटेल, त्यांना मतदान करा. पण मतदान जरुर करा”, असे शरद पवार यांनी सांगितले.