पुणे : भ्रष्टाचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी राष्ट्रवादीवर (अजित पवार गट) केली. झारखंड काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरेंद्र साहू यांच्या घरात कोट्यवधींची रोकड सापडली आहे, या भ्रष्टाचारप्रकरणी शहर भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं, यावेळी ते बोलत होते.
भंडारी म्हणाले, काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना राष्ट्रवादीतील नेतेही यात मागे नाहीत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची यापूर्वी यंत्रणांनी चौकशी केली होती. पुढे काय होईल, हे नंतर समजेल. तसेच साहू तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. आतापर्यंत त्यांच्या घरात ३०० कोटींची रक्कम सापडली असून अजून मोजणी सुरू आहे. साहू यांचे अवैध धंदे माहीत असताना काँग्रेसने त्यांना वारंवार संधी का दिली? सध्या सुरू असलेल्या कारवाईवर काँग्रेसकडून कुठलीही प्रतिक्रिया का आली नाही अथवा साह यांना पक्षातून निलंबित का केलं नाही? असा सवाल भंडारी यांनी केला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले, कॉंग्रेस नेत्यांकडे करोडो रुपयांची संपत्ती सापडत असेल तर गांधी खानदानाची संपत्ती किती, असा प्रश्न उपस्थित केल्यास काँग्रेसला राग येण्याच कारण नाही. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे ‘भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे.
मोदी सरकार यापुढे भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई करत राहील. केवळ राजकीय नव्हे, तर व्यावसायिक आणि इतर क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील नावेदेखील समोर आली पाहिजेत, असं भंडारी म्हणाले.