कोल्हापूर : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील मैत्रीतून दोघांचे प्रेम फुलत गेले, व १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रपोज केले. आणि अखेर ते दोघे एकमेकांचे जीवनसाथी बनले आहेत.
बाबूराव पाटील (वय ७८, शिवनाकवाडी (ता. शिरोळ) व अनुसया शिंदे (वय ६८,वाघोली जि. पुणे) हे दोघे विवाहबद्ध झालेल्या जोडप्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबूराव पाटील यांच्या पत्नीचे निधन होऊन सुमारे २२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. ते या अश्रामात दीड वर्षांपूर्वी आले होते. तर अनुसया या आपल्या पती समवेत सहा ते सात वर्षांपूर्वी येथे आल्या होत्या. तर मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे जानकी आश्रमातच वृद्धापकाळाने काळाने निधन झाले. जोडीदार गेल्याने त्या खचल्या. उदास राहू लागल्या.
वृद्धाश्रमात राहणारे बाबूराव यांच्या निदर्शनास ही बाब आली. सुख- दुःखाची देवाणघेवाण करणाऱ्या या वयात बाबूराव आणि अनुसया यांच्या विचारांची गट्टी जमली. कुठून तरी अनुसया या आनंदी राहतात हेच महत्त्वाचे होते.
त्या कधी दुःखी दिसल्या की आश्रमाचे व्यवस्थापन करणारी मंडळी ‘अहो कशाला दुःखी होता. तुमचा दोस्त आहे. त्यांच्याबरोबर बोलत बसा की, ” असे थट्टेने म्हटली की त्या लाजायच्या.
दरम्यान, १४ फेब्रुवारीला आश्रमातील मंडळी ‘रोटी डे’ साजरा करायला अन्य ठिकाणी गेली होती. तेव्हा बाबूराव यांनी या दिवसाचे औचित्य साधून चक्क अनुसया यांना ‘प्रपोज’ केले. हे समजताच संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी दोघांशीही बोलून तुम्ही लग्नाला तयारआहात का? असे विचारले. त्यावेळी दोघांकडून संमती मिळताच याबाबत लिहूनही घेतले. कष्टाचे वय नसल्याने आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ही महत्त्वाचा असल्याने लग्न झाले तरी शेवटपर्यंत वृद्धाश्रमातच राहून जीवन जगायचे, हेही त्यांच्याकडून लिहून घेतले.
दोघांनी ही आनंदाने ही बाब मान्य केली आणि लग्नाची तयारी सुरू झाली. मणी मंगळसूत्र आणले. मंडप सजविला. शिरा-भाताचे जेवण करून रीतसर लग्न लावून देण्यात आले. एकमेकाला सांभाळण्यासाठी ते ‘मनाने’ जवळ आले.
वृद्धाश्रमात ‘आधारा’च्या आशेवर फुललेले हे प्रेम नक्कीच एक वेगळी अनुभूती देऊन गेले. उतार वयात आधार कोणाचा अशी समस्या जटिल होत असताना बाबूराव व अनुसया यांचे फुललेले प्रेम हे त्याचे उत्तर बनून गेले. तर चेष्टेतून सुरू झालेल्या या प्रेम कहाणीला वृद्धाश्रमाचे प्रमुख बाबासाहेब पुजारी यांनी मूर्त रूप दिले.