पिंपरी : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे. शहरात महापालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्ह, नावे झाकण्याचे, तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, भाजपकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर पक्षाचे चिन्ह कायमस्वरूपी रंगविण्यात आले आहे. भाजपने जाणूनबुजून शहरभर कमळ चिन्हाचे वॉल पेंटिंग केले आहे. हे चिन्ह तत्काळ मिटवावे, तसेच संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
याबाबतची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, ‘एमआयएम’चे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिरादार यांनी तशी तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकीय पक्ष, चिन्ह, नावे झाकण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र, भाजपच्या भिंतीवर कायमस्वरूपी रंगविलेल्या चिन्हाकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे. भाजप नेत्यांवर कारवाई झाली नाही, तर आम्हीही भिंती रंगवून आमच्या पक्षाचा आणि चिन्हाचा प्रचार करू, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त, निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.
दरम्यान, आचारसंहिता १६ मार्चपासून सुरू झाली आहे. या दरम्यान पहिल्या चार दिवसांमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघात चार, चिंचवड विधानसभा मतदारसंघात तीन तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एक अशा एकूण ८ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावर कारवाई केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करायच्या असल्यास सी-वीजिल पोर्टल, तसेच १८००२३३०१०२ आणि १९५० या टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली आहे.