लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांना शोधण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. न्हावी सांडस (ता. हवेली) या ठिकाणावरून शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांचे सहकाऱ्यांनी कोळपे यांचा शोध घेतला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे हे हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने शुक्रवारी (ता. 26) दुपारी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. माझा अपमान केला, असे बोलून जेवण अर्धवट ठेवून पाच मिनिटांत येतो असे सांगितले. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी घरातून निघून गेल्याचा जबाब त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यातील शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे हे शुक्रवारी दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी पुढील काही काळासाठी मला कोणीही कॉल अथवा मेसेज करू नये, असे स्टेटस व्हाटसअॅपवर ठेवले होते. यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोळपे वापरत असलेले दोन्ही मोबाईल बंद लागले.
दरम्यान, याबाबत घरी फोन करून माहिती घेतली असता दोन्ही मोबाईल घरी असून साहेब बाहेर गेले असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तांत्रिक मदतीच्या साहाय्याने न्हावी सांडस (ता. हवेली) या ठिकाणावरून राहुल कोळपे यांना शोधून काढण्यात यश मिळवले आहे. पोलीस अधिकारी हरवल्याची चर्चा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाऱ्यासारखी पसरली होती. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याने हरवलेल्या कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची देखील चर्चा पोलीसांसह नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.