विशाल कदम
Loni Kalbhor: लोणी काळभोर (पुणे): वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने लोणी काळभोरच्या तलाठ्यांना कोणतीही भीती राहिल्याचे दिसत नाही. त्यांचे अनेक अवैध उद्योग नियमित सुरु आहेत. आता महसुलचे नियम धाब्यावर बसवल्याचा असाच एक प्रकार समोर आला आहे. संपूर्ण क्षेत्राचा विक्री व्यवहार केला तर नोंद नामंजूर, मात्र तुकडा पाडून अंशतः क्षेत्राचा विक्री व्यवहार केला तर फेरफार मंजूर असा प्रकार थेऊर सर्कल कार्यालयात सुरू आहे. यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचे नेमके इनटेंन्शन काय, हे नागरिकांना समजेनासे झाले आहे. चुका तलाठी व सर्कलच्या आणि त्यांच्या हेलपाट्यांची शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागत असल्याचा प्रकार सुरू झाला आहे.
लोणी काळभोर येथील तलाठी पद्मिनी मोरे आणि थेऊरच्या सर्कल जयश्री कवडे यांनी सामाईकातील अविभाज्य हिस्यातील अशंत: क्षेत्राची म्हणजेच तुकड्यातील तुकडा विक्रीची फेरफार नोंद (क्रमांक १४६९५) ही मंजूर केली आहे. लोणी काळभोर येथील गट क्रमांक ८१० मधील २० गुंठे क्षेत्र हे १७ जणांच्या नावावर खाते क्रमांक ३५०२ अन्वये सामाईक क्षेत्रात आहे. यामध्ये कोणाचीही हिस्सेवारी नमूद नसताना १७ जणांमध्ये असलेल्या वीस गुंठ्यातील एका धारकाने आपल्या क्षेत्रापैकी काही अंशतः क्षेत्र (संपूर्ण नाही) २०१३ साली दुय्यम निबंधक हवेली-९ (कात्रज) पुणे यांचेकडील दस्त क्रमांक ८१६६ दिनांक 26/8/2013 अन्वये फेरफाराचा प्रकार अनोंदणीकृत, नोंदीचा प्रकार खरेदी (अविभाज्य हिस्सा अंशतः विक्री) मधील लिहून देणार यांच्या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्साचे अंशतः क्षेत्र ०.०१०० हे.आर चौ.मी. ही फेरफार नोंद २८ ऑक्टोबरला थेऊरच्या सर्कल यांनी मंजूर केलेली आहे.
थेऊर येथील गट नबंर १८९ मधील शेतकऱ्याने त्याच गटातील दुसऱ्या शेतकऱ्याचे संपूर्ण क्षेत्र खरेदी केले, तरीही फेरफार क्रमांक ६५८४ नोंद रद्द केली आहे. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याची त्याच गटात मालकी हक्कांत अगोदरच जमीन मिळकत आहे. एकाच विषयाच्या संबंधित निर्णय घेताना वेगवेगळी नियमावली वापरण्याचा प्रकार थेऊरच्या सर्कल कार्यालयात सुरू आहे. तलाठी आणि सर्कलच्या प्रोटोकॉलच्या भूमिकेमुळे महसूलच्या नवनवीन नियमावलीचा फंडा उदयास येऊ लागल्याने पुणे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान थेऊर सर्कल जयश्री कवडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क केल्यानंतर ‘पुणे प्राईम न्यूज’मधून बोलतोय, असे सांगितल्यावर ताबडतोब कॉल कट केला.
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्यातील ०७/०९/२०१७ रोजीच्या तरतुदीनुसार मिळकतीचा हस्तांतरण व्यवहार नियमानुकूल करणेबाबत व त्यानुसार, महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमातील तरतूदीनुसार तुकड्यांमधील नोंदी नियमित करणेकामी शासकीय बाजारमूल्यांच्या पंचवीस टक्के रक्कम नजराणा शासनाला भरण्याचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे तलाठी व सर्कल तुकड्यांतील नोंदी टाकत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाला तोट्यात ढकलणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे.
– राघवदास चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे
फेरफार मंजूर किंवा नामंजूर केला याबाबत तक्रार करा. तक्रारीनंतर चौकशी करुन अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच तहसीलदार व प्रांताधिकारी यांचा अभिप्राय घेतल्यास नेमकी माहिती मिळेल.
– हिंमत खराडे,रजा राखीव उपजिल्हाधिकारी, पुणे
मला याबाबतची माहिती मेसेज करा, मी एका मिटींगमध्ये आहे. मिटींग संपल्यावर मी चेक करतो.
– सचिन आखाडे, महसूल नायब तहसीलदार, हवेली
दरम्यान, महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी सांगितल्याप्रमणे त्यांना माहिती पाठविण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही.