लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परीसरात एका शालेय विद्यार्थिनीचे मंगळवारी (ता. 07) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली होती. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी या घटनेमागचे खरे सत्य समोर आणले आहे. त्यामुळे विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न नसल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतून घरी निघालेल्या मुलीला एका बुरखा घातलेल्या महिलेने जबरदस्तीने ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलगी व तिच्या आईवडिलांना भेट देऊन त्यांना विश्वासात घेतले. व या घटनेची पुन्हा सर्व माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावतो, असे आश्वासन दिले होते.
पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, शालेय विद्यार्थिनीला महिलेने हटकल्याचे दिसून आले. त्यावेळी मुलीने हात झटकून पळ काढल्याचे दिसून येत होते. या घटनेची पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी गंभीर दखल घेऊन सदर घटनेचा तपास करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखा व एक तपास पथक अशी दोन पथके तयार केली. पोलिसांच्या पथकांनी कवडीपाट परिसरातील 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, संबंधित महिलेसोबत असलेली महिला ही याच परिसरातील असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस त्वरित संबंधित महिलेच्या घरी गेले. व बुरखा घातलेली व्हिडीओ मधील महिला कोण असल्याचे विचारले. तेव्हा संबंधित महिलेने ती बुरखा घातलेली महिला तिची नणंद असल्याचे सांगितले. लोणी काळभोर पोलिसांनी संबंधित दोन्ही महिलांना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बोलाविले. संबंधित महिलांकडे चौकशी केली असता, बुरखा घातलेल्या महिलेने सांगितले की, 15 नंबर परिसरात राहत असून एका कपड्याच्या दुकानात काम करीत आहे. तर कवडी पाट परिसरात भाऊ व भावजय राहत असून त्यांना तीन मुले आहेत. त्यांच्याकडे कपडे शिवण्यासाठी मंगळवारी गेली होती. यावेळी भावजय व तिची मुले सोबत होती.
दरम्यान, रस्त्यातून जात असताना शाळा देखील सुटली होती. त्याचवेळी भावाची मुले शिकावीत, दररोज शाळेत जावीत. या उद्देशाने एका मुलीला रस्त्यात थांबविले. तू शाळेत जातीय? आमच्या मुलीलासुद्धा शाळेत जायाला सांग. चल माझ्याबरोबर असे, हिंदी भाषेत संबंधित महिला बोलल्या. त्यानंतर मुलीने तेथून पळ काढला. यामध्ये आमचा कोणताही अपहरणाचा प्रयत्न नव्हता तर माझ्या भावाच्या मुलांनीही या मुलांचा आदर्श घेऊन शाळा शिकावी. असा उद्देश होता. मात्र, त्या शाळकरी मुलीला हिंदी भाषा न समजल्याने हा गोंधळ झाला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळून या पाठीमागचे खरे कारण शोधून काढले आहे. हा अपहरणाचा प्रयत्न नसून केवळ संबंधित महिलेच्या भावाच्या मुलांनी देखील अभ्यास करावा. यासाठी शाळकरी मुलीला रस्त्यात थांबविले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी या घटनेची संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर संबंधित महिलांकडून लेखी जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेचा कौशल्यपूर्वक छडा लावल्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.