लोणी काळभोर, (पुणे) : माथाडी बोर्डाचे नेते असल्याची बतावणी करून गोदाम मालकाकडे प्रत्येक गाडीमागे १५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत १२ ते १७ जानेवारी दरम्यान ही घटना घडली.
शेखर अनिल मोडक (वय २९, रा. वडकी), अण्णा उर्फ संतोष किसन देवकर, (वय – ३४, रा. अक्वा मॅजेस्टिक सोसायटी फुरसुंगी), साहस विश्वास पोळ (वय २५, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, वडकी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच आणखी तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहसीन शहाजान शेख (वय ३६, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांचे उरुळी देवाची परिसरात स्वत:चे गोदाम आहे. शेखर मोडक, आण्णा देवकर व त्यांच्यासोबत असलेले चार अनोळखी इसम यांनी मिळून आम्ही माथाडी बोर्डाचे नेते आहोत. गोदामामधील काम आमचे कामगार करणार, असे म्हणून शेख यांना याबाबत कोणतीही नोटीस न देता त्यांचे काम बंद केले. तसेच काम सुरु करायचे असेल, तर एका गाडीपाठीमागे १५ हजार रुपये द्यावे लागतील. तरच तुम्ही काम सुरु करू शकता असे सांगितले.
यावर फिर्यादी शेख यांनी माथाडी कामगार ठेवायचे नाहीत, मला परवडत नाही असे सांगितले. परंतु, आरोपी यांनी निदान एका गाडीपाठीमागे ७ हजार रुपये दे नाही तर तुझ्या गोदामामध्ये येणाऱ्या गाड्या तु कशा खाली करतो? तेच बघतो असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून जावे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेख यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेखर मोडक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार अण्णा उर्फ संतोष देवकर, साहस पोळ यांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.