लोणी काळभोर : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन एका नराधमाने सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्रद्माकर मधुकर एडके (वय ५०, पत्ता माहिती नाही) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील आणि आरोपी हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. पीडितेचे आई-वडील हे दोघेही मोलमजुरी करत आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी ही एका शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तर तिचा लहान भाऊही तिच्यासोबतच शाळेत जात होता. तर आरोपी प्रद्माकर एडके हा एका खासगी कंपनीत वाहनचालक आहे.
दरम्यान, पीडित मुलीचे आई-वडील कामाला गेल्यानंतर आरोपी हा घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन घरात शिरत होता आणि पीडित मुलीच्या भावाला दुकानाला चॉकलेट अथवा बाहेर खेळण्यासाठी पाठवित होता. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता. यातील धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सलग चार महिने सुरु होता.
वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर ती बोलली
या वारंवार त्रासाला कंटाळून पीडित मुलीने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला व शेजारच्या काकूला सांगितला आणि शेजारच्या काकूने घडलेला प्रकार पीडितेच्या आईला सांगितला. तेव्हा पीडित मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी प्रद्माकर एडके याच्याविरोधात तक्रार दिली.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी आरोपी प्रद्माकर एडके याला अटक केली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती मेधे करत आहेत.