लोणी काळभोर, (पुणे) : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील तब्बल २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील फुलेनगर येथे सोमवारी (ता. ६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी संजय दत्तात्रय रायकर (वय ४९, रा. माळीमळा फुलेनगर, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय रायकर हे कुटुंबासोबत नातेवाईकांकडे शनिवारी (ता.४) गेले होते. संजय रायकर यांच्या घरापासून १५० मीटर अंतरावर आई राहत आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आईला घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी आईने मुलगा संजय याला आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यांनतर आईने घरात जाऊन पाहिले असता, घरात कोणीही आढळून आले नाही. मात्र घरातील सामान अस्थावस्थ अवस्थेत पडल्याचे आढळून आले. तसेच कपाटाचे लॉकर तुटलेले आढळून आले. त्यानंतर या घटनेची माहिती आईने आपल्या मुलाला ताबडतोब दिली.
दरम्यान, मुलगा संजय रायकर हे घरी आल्यानंतर त्यांना कपाटात ठेवलेली १५ हजार रोख रक्कम, ३ तोळे सोन्याचे दागिने व १२ भार वजनाची चांदी असा सुमारे २ लाख रुपये वजनाचा मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर संजय रायकर यांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.