लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात पायी निघालेल्या एका ३६ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (ता.७) रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी (ता. ११) रात्री त्याचा मृत्यू झाला.
राजेश नवनाथ कांबळे (वय ३६, रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे चुलत बंधू बाबासाहेब कांबळे (वय ३२, रा. प्रगतीनगर, भेकराईनगर, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास राजेश कांबळे हे लोणी स्टेशन चौकातून रस्ता ओलांडत होते. यावेळी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात राजेश कांबळे यांच्या डोक्याला जबर मार लागला होता.
राजेश कांबळे याला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बाबासाहेब कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करत आहेत.