लोणी काळभोर (पुणे) : येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी यश बापूसाहेब काळभोर याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात त्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, आता विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. आहे.
यश काळभोर याने प्रथम हवेली तालुका स्तरावरील शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. जिल्हा स्तरावरीय कुस्ती स्पर्धेत यश बापूसाहेब काळभोर याने अंतिम कुस्ती फेरीत बारामती येथील पैलवानला चितपट करून जिल्हास्तरावरील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकत्याच राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी या ठिकाणी संपन्न झाल्या. जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत यश बापूसाहेब काळभोर यांची निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूला एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभागाचे प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, संस्थेच्या संचालिका इराणी, संस्थेचे संचालक अविनाश शेलूकर, एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शमशाद कोतवाल, एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या खुशबू सिंग व शिक्षकवृंद यांनी यशस्वी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले.