लोणी काळभोर, ता. १६ : हवेली तालुक्यातच नव्हे, तर संपुर्ण जिल्ह्यात महसुलीदृस्ट्या महत्वाचे व अंत्यत संवेदनशील असलेल्या लोणी काळभोर (लोणी काळभोर व कदमवाकवस्ती) तलाठी कार्यालयाचा कारभार चक्क तलाठ्याचा वाहन चालक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याहुनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे हा वाहन चालक तलाठ्याच्या गैरहजरीत तलाठ्याचे शासकीय “डीएससी” (डिजीटल सिग्नीचर सर्टीफिकेट) वापरुन बेकायदा नोंदीही टाकत असल्याचेही उघड झाले आहे.
हवेली तालुक्यातील एका गाव कामगार तलाठी कार्यालयात ‘पतीची तलाठी लुडबुड’ अशी बातमी ‘पुणे प्राईम न्यूज’ने तीन महिन्यांपूर्वी प्रसिध्द केली होती. या बातमीची चर्चा पुर्व हवेलीत अद्याप सुरु असतानाच, त्याही पुढे जात आता तलाठ्यांचे वाहन चालकही तलाठ्यांचे शासकीय कामकाज करू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे हवेली तालुक्याच्या महसुल विभागाच्या आब्रुची लक्तरे वेशीवर टांगल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, लोणी काळभोरच्या तलाठी पद्मीनी मोरे यांनी आपल्या गैरहजरीत शासकीय “डीएससी” (डिजीटल सिग्नीचर सर्टीफिकेट) वापरुन शासकीय संगणकावर काम करणारा व्यक्ती त्यांचा वाहन चालक नसल्याचे स्पष्ठीकरण दिले असले, तरी तो त्यांचाच वाहन चालक असल्याचे भक्कम पुरावे ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागले आहेत. यामुळे लोणी काळभोर तलाठी कार्यालयात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या प्रकरणात महसुल विभागातील वरीष्ठ अधिकारी काय भुमिका घेतात, याकडे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या गावांसह संपुर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एक युवा शेतकरी आपल्या कामासाठी मंगळवारी (१० आक्टोबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांना तलाठी व कोतवाल दोघेही कार्यालयात हजर नसल्याचे दिसुन आले. तलाठी कार्यालयात तलाठी व कोतवाल नसले तरी, एक अनोळखी व्यक्ती कार्यालयातील संगणकावर काम करत असल्याचे दिसले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्ती तलाठ्याचे शासकीय “डीएससी” (डिजीटल सिग्नीचर सर्टीफिकेट) वापरुन कार्यालयातील संगणकावर काही बेकायदा नोंद करणे, सातबारा, फेरफार ऑनलाईन टाकण्याचे काम करत असल्याचेही संबंधित शेतकऱ्याच्या निर्दशनास आले.
दरम्यान, तलाठी कार्यालयात चुकीचे काम सुरु असल्याचे पाहून संबंधित शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये त्या अनोळखी व्यक्तीचे संगणकावर काम करत असतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व काही फोटोही काढले. त्याचवेळी शेतकऱ्याने या व्यक्तीकडे त्याच्या ओळखीबाबत विचारणा केली असता, संबधित व्यक्तीने आपण तलाठी महोदयांचे वाहन चालक असल्याची कबुली दिली.
याबाबत लोणी काळभोरच्या तलाठी पद्मिनी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, लोणी काळभोर तलाठी कार्यालयात संगणक हाताळणारा व्यक्ती हा आपला वाहन चालक नसून, तो जिल्हाधिकारी कार्यालयातील एक ऑपरेटर आहे. तो अधिकृत नसून, आता तो काम करीत नाही. आणि त्याला दोन दिवसापूर्वीच कामावरुन काढून टाकलेले आहे.
दरम्यान, लोणी काळभोर तलाठी कार्यालायत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीतील १० हजाराहुन अधिक शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणारे १९९२ पासून ते आत्तापर्यंतचे सर्व सातबारा व सर्व फेरफार महसूलचे रेकॉर्ड आहे. २०१६ पासून ऑनलाईन सातबारा व फेरफार सुरु झाले आहेत. १९९२ ते २०१६ पर्यंतचे हस्तलिखित सातबारा व फेरफारसह इतर शासकीय रेकॉर्ड सुस्थितीत ठेवणे, जतन करणे हे संबंधित तलाठ्याचे शासकीय कर्तव्य आहे.
ही महत्वाची कागदपत्रे व तलाठी कार्यालायतील संगणक तेही शासकीय “डीएससी” (डिजीटल सिग्नीचर सर्टीफिकेट) सह एका अनोळखी व्यक्ती वापरते, ही बाब धक्कादायक आहे. लोणी काळभोर तलाठी कार्यालय हाताळणारी ती अनोळखी व्यक्ती आणि त्या व्यक्तीला कार्यालय हाताळु देणाऱ्या लोणी काळभोरच्या तलाठी पद्मीनी मोरे याची चौकशी होण्याची गरज आहे. तशी ही चौकशी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोणी काळभोर तलाठी कार्यालयाबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ने उपस्थित केलेले प्रश्न
१) तलाठी कार्यालयात तलाठी व कोतवाल हजर नसताना, तलाठ्याच्या ड्रायव्हरला कार्यलयाचा कारभार पाहण्यासाठी कोणी आदेश किंवा परवानगी दिली ?
२) लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावच्या तलाठ्याची डीएससी ड्रायव्हरकडे आली कशी ?
३) संबंधित ड्रायव्हरने त्या डीएससीच्या आधारे कोणत्या नोंदी टाकल्या अथवा डीएससीचा वापर केल्याबाबतची तातडीने चौकशी होणार का ? कारवाई होणार का?
४) पुर्ण वेळ तलाठ्याची मुदतपूर्व बदली, त्याजागी ३० किलोमीटरवरून आयात केलेले तलाठी, मग त्यांची उचलबांगडी, त्यांच्या जागी पंधरा किलोमीटर अंतरावरील अर्धवेळ तलाठी व त्यानंतर अर्धवेळ तलाठ्याचा चार्ज काढुन पुन्हा त्याजागी तीस किलोमीटर आयात केलेले तलाठी अशी “सर्कस” कशासाठी? या सर्कशीला हवेलीचे तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांची मुक संमती आहे का?
५) पद्मिनी मोरे यांच्या स्पष्टीकरणानुसार, तो व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमला होता तर त्याचे नाव काय? त्याच्या नेमणुकीची ऑर्डर मिळेल का? त्यांच्या हाती तलाठी वापरतात ते”डीएससी” (डिजीटल सिग्नीचर सर्टीफिकेट) कसे आले? या व्यक्तीने बेकायदा नोंदी केल्या कशा?