Loni Kalbhor News : लोणी काळभोर,ता. २६ : ढोल ताशाच्या गजरात आणि हजारों विद्यार्थ्यांच्या जल्लोषात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठातील गणपती बाप्पाला पारंपारिक पद्धतीने निरोप दिला आहे.
गणेशोत्सव काळात विविध उपक्रम
विद्यापीठात श्री गणेशाची मंगळवारी (ता.१९) प्रतिष्ठापणा करण्यात आली. या गणेशोत्सव काळात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करण्यासोबतच आपल्या मधुर आवाजात गायलेल्या गाण्यांना, नाटकांना प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
दरम्यान, या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी, विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, डॉ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ.महेश चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनच्या लॉनपासून सुरु झाली. या मिरवणुकीत पारंपारिक ‘गजकर्ण’ या ढोल पथकाच्या वाद्याने सुरु झाली. मनसोक्त गुलालाची उधळण करत विद्यार्थ्यांनी अखेर सायंकाळी विद्यापीठातील विसर्जन घाटावर भावूक होऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
यावेळी इन्स्टिट्यूट डिजाईनचे प्रमुख डॉ.नचिकेत ठाकूर, विद्यार्थी घडामोडी प्रमुख डॉ. सुराज भोयार यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांतील प्राध्यापक उपस्थित होते.