Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाला केंब्रिज विद्यापीठाच्या प्रतिष्ठित ‘द एक्सलन्स इन एम्प्लॉयबिलिटी सपोर्ट’ पुरस्काराने सन्मानि करण्यात आले आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या केंब्रिज सेंटर लीडर्स परिषदेमध्ये जगभरातील केंब्रिज नेत्यांच्या उपस्थितीत एमआयटी एडीटीला ही मान्यता देण्यात आली.
उत्कृष्ट योगदानाबद्दल कौतुक
हा पुरस्कार एमआयटी एडीटीच्या स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे केंब्रिज अधिकृत परीक्षा केंद्र (आयए ६७९) माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षमतेत यशस्वी करिअर मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आला आहे. केंब्रिज इंग्लिशचे दक्षिण आशिया संचालक टी. के. अरुणाचलम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी, केंब्रिजचे प्रेस व मुल्यांकन संचालक अरुण राजमणी, पॉल कोल्बर्ट, या अधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एमआयटी एडीटीच्या केंब्रिज अधिकृत परीक्षा केंद्राने केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कौतुक केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या केंब्रिज अधिकृत परीक्षा केंद्राने सातत्याने शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वांगीण विद्यार्थी विकासासाठी वचनबद्धता कायम ठेवताना भरीव योगदान दिले आहे. या पुरस्कारामुळे निश्चितच उच्च शिक्षण आणि रोजगार क्षमता निर्मितीसाठीच्या एमआयटीच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
याबाबत बोलताना एमआयटी, एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, “प्रतिष्ठित एक्सलन्स इन एम्प्लॉयबिलिटी सपोर्ट पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. हा पुरस्कार आमचे शिक्षक सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांप्रति समर्पणाचे एक उत्तम उदाहरण आहे. इथून पुढेही यशस्वी विद्यार्थी घडविण्याचे हे कार्य अखंडितपणे सुरु राहील. तरी या उपलब्धीसाठी डॉ. अतुल पाटील व एमआयटी स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट व विद्यापीठातील अधिकृत केंब्रिज परिक्षा केंद्राच्या सर्व टीमचे अभिनंदन..”