लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावान कार्यकर्ते अशी ओळख असलेले संतोष गोरख फणसे यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या हस्ते नुकतेच संतोष फणसे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी क्रिडा आघाडी प्रदेश अध्यक्ष संदीप भोंडवे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उद्योग आघाडी महेश थोरात, भाजपा तालुका अध्यक्ष शामराव गावडे, भाजपा हवेली तालुका सरचिटणीस दिनेश झांबरे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गौरव झुरुंगे आदी भाजपाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, भाजपा विरोधी पक्षात असताना तसेच सत्ता नसताना सुद्धा आपल्या आंदोलन आणि सामाजिक कार्यावर हवेली तालुक्यात भाजपाचा प्रचार आणि प्रसार करण्यात संतोष फणसे यांनी मोठी भूमिका बजावली. २०१४ मध्ये पक्ष वाढविण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. पक्षाने त्यांची फेरनिवड करून त्यांना पक्ष बळकट करण्याची जबाबदारी दिली.
याबाबत बोलताना नवनिर्वाचित उपाध्यक्ष संतोष फणसे म्हणाले, “जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष संदीप सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणीचे काम जोरात सुरु केले आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्ष वाढीसाठी आजूनही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.