हनुमंत चिकणे
Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यनगरीचा दोन दिवसाचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन लाखो वारकऱ्यांसह ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी उद्या बुधवारी (ता. १४) लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मुक्कामी येत आहे. (Effective implementation of “Nirmalwari” initiative on Loni Kalbhor to Palkhi route; 1000 mobile toilets have been set up in the area.)
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर ”निर्मलवारी” उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. (Loni Kalbhor News) त्यानुसार २०२३ आपली वारी निर्मल वारी” मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १५ ठिकाणी १ हजार मोबाईल शौचालये उभारण्यात आली आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या माध्यमातून उभारणी
कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत १५ ठिकाणी महामार्ग प्रमुख संतोष दाभाडे, महामार्ग सहप्रमुख विशाल वेदपाठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या सहयोगाने मोबाईल शौचाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्यात असणाऱ्या वारकऱ्यांच्या नैसर्गिक विधीची अडचण होते. लाखोंच्या संख्येने येणा-या वारक-याची सोय करणे ग्रामपंचायत प्रशासनाला पुरेश्या निधीअभावी शक्य होत नाही. हि अडचण ओळखून २००५ मध्ये पुणे शहराचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी या कामी पुढाकार घेतला होता. त्यानुसार त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर लोणी काळभोर व यवत येथे प्रत्येकी दोनशे मोबाईल शौचालये उभारण्यात आली होती. सदर योजनेस वारक-यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने शासनाने ती प्रतिवर्षी राबवून अनुदान देण्यास सुरुवात केली.
शौचालये उभारणीचे हे काम पुण्यातील सारा प्लाष्ट ही कंपनी करत आहे. यावर्षी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखी तळ येथे १०० तसेच कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, स्वामी विवेकानंद नगर, (Loni Kalbhor News) संभाजी नगर येथे प्रत्येकी ५० व एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे २० याचबरोबर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत बाजार मैदानात २००, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज १००, भराडे आळी ६०, डाक बंगला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रत्येकी ५०, महादेव मंदीर ३० तसेच पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा १०, जिजाऊ गार्डन व कुंजीरवाडी फाटा येथे प्रत्येकी २०, गोविंद लॉन्स सोरतापवाडी येथे १०, तसेच उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी विद्यालय येथे २५ व पिराचे ठिकाणी ५ शौचालये उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, एका शौचालयाचे दहा सुट्टे भाग नट- बोल्ट व रिबेटच्या सहाय्याने एकत्र जोडून शौचालय अर्ध्या तासात ऊभारण्यात येते. यासाठी कंपनीच्या वतीने ९० कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते शौचालय उभारणी व स्वच्छतेचे काम करणार आहेत. पाण्यासाठी १५ टॅकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित राहूनही संबंधित गावांत घाण होत नाही. तसेच दुर्गंधी व रोगराई पसरत नाही.
याबाबत बोलताना महामार्ग प्रमुख संतोष दाभाडे म्हणाले, “संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत होती. २०१५ सालापासून हा उपक्रम राबवत आहोत. पहिल्या वर्षी ७० टक्के यश आले. काही नागरिकांनी या संदर्भात नावे ठेवली मात्र न खचता २०१५ सालापासून हि काम पुढे सुरूच ठेवले. यामुळे दिंडी अथवा पालखी सोहळ्यात स्वच्छतागृहाची सोय करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांचीहि संख्या वाढली आहे. तसेच गाव हागणदारीमुक्त होऊन परिसरात कोणत्याही प्रकारची घाण होत नाही. या उपक्रमामध्ये सर्वच सहकारी मोठे कष्ट घेतात. त्यामुळे ”निर्मलवारी” चांगल्याप्रकारे पार पडते.”