Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता.१६ : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रवादी संगे मंगळागौर स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील नक्षत्र मंगळागौरी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या ग्रुपच्या निलम खेडेकर व सुनिता काळभोर यांच्या नेतृत्वाखाली संघाने हे विजेतेपद पटकावले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांत पटकावल्याने लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह परिसरात नक्षत्र मंगळागौरी ग्रुपच्या सर्व महिलांचे कौतुक केले जात आहे.
नक्षत्र मंगळागौरी ग्रुपच्या सर्व महिलांचे कौतुक
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मुंबई (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्य मंदिर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय राष्ट्रवादी संगे मंगळागौर स्पर्धा २०२३ नुकतीच पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून १०० हून अधिक महिलांच्या ग्रुपने सहभाग घेतला होता. यात नक्षत्र मंगळागौरी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला असून, विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘राष्ट्रवादी संगे मंगळागौर स्पर्धा २०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातून १०० हून अधिक महिलांच्या ग्रुपने सहभाग घेतला होता. महिलांच्या मंगळागौरी ग्रुपने व्हिडिओ बनवून पाठवले होते. त्यातील १० बेस्ट ग्रुप निवडून त्यांना मुंबई येथे बोलवण्यात आले. या ग्रुपमध्ये लोणी काळभोर (ता. हवेली) येथील नक्षत्र मंगळागौरी ग्रुपचाही समावेश होता. या स्पर्धेत नक्षत्र मंगळागौरी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला.
नक्षत्र मंगळागौरी ग्रुपच्या महिलांचे यश अतुलनीय
याबाबत अधिक माहिती देताना सुनिता काळभोर म्हणाल्या, ‘राज्यस्तरीय राष्ट्रवादी संगे मंगळागौर स्पर्धेत मिळालेले यश हे नक्षत्र मंगळागौरी ग्रुपमधील सर्व महिलांचे आहे. नीलम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा ग्रुप ४० वर्षांपुढील महिलांचा असून, तो तंदुरुस्त आहे. या सर्वच महिला नोकरदार तसेच व्यावसायिक असल्यामुळे त्यांना खूप त्रास देखील सहन करावा लागला. कारण त्यांना बरेच काही नियोजन करावं लागायचे. त्या दिवसभर काम करत असे. तर रात्री आठ ते साडे नऊपर्यंत सराव करत होत्या’.
दरम्यान, त्रिशा खेडकर या चिमुकलीने सुद्धा स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेतली आहे. त्रिशा ही निलम खेडेकर यांची कन्या आहे. रुपाली चाकणकर यांनी तिचे खूप कौतुक केले.
आदिशक्तीच्या विविध रूपात महिला करताहेत जागर
घरातील गृहिणीपदाची जबाबदारी सांभाळून नोकरी व व्यवसाय प्रामाणिकपणे करत असताना त्या आपल्या छंदातून हिंदु संस्कृतीची ओळख असलेल्या आणि नुकत्याच ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटाच्या निमित्ताने नव्यानं प्रसिद्ध झालेल्या मंगळागौर या कार्यक्रमातून जपणूक केली आहे. या महिला आदिशक्तीच्या विविध रूपात जागर करत आहेत.
विजेत्या नक्षत्र मंगळागौरी ग्रुपमधील विजेत्या महिला स्पर्धकांची नावे पुढीप्रमाणे :
नीलम खेडेकर, सुनिता काळभोर, लता नेमाणे, आशा वाघमोडे, स्वाती मेमाणे, सुजाता शेलार, मोनिका शिंदे, ज्योती गुजर, शीतल शेंडगे, ज्योती पाचभाई, सारिका खताळ व त्रिशा खेडेकर..