लोणी काळभोर (पुणे) : अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिला धमकावत, तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याच अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तिने नुकताच बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील एका तरुणावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात राहणाऱ्या पीडित १५ वर्षांच्या मुलीने रविवारी (ता. २४) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय मल्लाप्पा मदिनकरी (वय १८, रा. शेवाळवाडी, ता. हवेली) याच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार जून २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीत शेवाळवाडी येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या बालपणाचा गैरफायदा घेतला. तिला धमकावत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला.
दरम्यान, याबाबत कोणाला काही सांगितले तर लहान भावांना जीवे मारून टाकण्याची धमकी पीडितेला दिली. रविवारी (ता. २४) पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रोकडे करीत आहेत.