विशाल कदम
Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील एका खासगी शाळा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थी व वाहनचालकांची रस्त्यावरच गर्दी होत आहे. पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थी वाहतूकीसाठी ये-जा करणाऱ्या स्कूलबस, रिक्षा, चारचाकी वाहने, दूचाकी यामुळे संपूर्ण रस्ताच व्यापला जात असल्याने, रेल्वे प्रवाशी तसेच नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रवाशी, नागरिकांना नाहक मनस्ताप
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात एक नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील सरकारी नोकरदार, कामगार, शेतकरी व राजकीय पदाधिकाऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत.(Loni Kalbhor News) या शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थी स्कूलबस अथवा रिक्षाने येतात. तर काही मुलांचे पालक दुचाकी अथवा चारचाकीमधून सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येतात.
शाळा सुटण्याची वेळ दुपारी अडीच वाजण्याची आहे. त्यामुळे पालक ५ ते १० मिनिटे आधीच शाळेच्या गेटसमोर उभे राहून मुलांची वाट पाहत थांबलेले असतात. या वेळी स्कूल बस, रिक्षा, दुचाकी व चारचाकी गाड्या मुख्य रस्त्यावरच लावल्या जातात. (Loni Kalbhor News) त्यामुळे याठिकाणी या १० ते १५ मिनिटांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. परिणामी, येथून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना व नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
व्हिडीओ
रिक्षा, बसचालक सुसाट
उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीतील बहुतांश शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षामध्ये अक्षरशः कोंबल्याचे चित्र पहायला मिळते. रिक्षाचालक व बसचालक रस्त्यावरून जाताना वेगाने गाडी चालवितात. (Loni Kalbhor News) वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयीचे कोणतेही फलक शाळा परिसरात लावलेले नाहीत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.
शाळा प्रशासन मूग गिळून गप्प!
शाळेसाठी मोठे वाहनतळ तसेच मैदान असूनही बस, रिक्षा व पालकांना रस्त्यावर का थांबावे लागते, असा प्रश्न विचारल्यावर शाळा प्रशासनाकडून नेमके उत्तर मिळाले नाही. (Loni Kalbhor News) शाळेला विद्यार्थ्यांची काळजी नाही का? शाळेने फक्त विद्यार्थ्यांकडून मोठमोठे शूल्क घ्यायचे आणि इतर अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष करायचे, असे धोरण आखले आहे का? शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काही वाटत नाही का? असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
शाळेत विद्यार्थी ‘ट्रिपल सीट’
विद्यार्थी शाळेत येताना सायकल, एवढेच नव्हे तर दुचाकीने येतात. काही विद्यार्थी तर एकाच दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ प्रवास करताना दिसतात. (Loni Kalbhor News) अशा प्रकारे जीवघेणा प्रवास केला जात असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळेने लक्ष देण्याची गरज
शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमुळे भर रस्त्यात मोठी गर्दी होणे ही जणू नित्याचीच बाब झाली आहे. पालकांच्या वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. (Loni Kalbhor News) शाळा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर वाहतूक नियंत्रकाची नेमणूक केल्यास मूळ प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होऊ शकते, असे मत परिसरातील नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.