लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर-कोलवडी रस्त्यावरील मुळा-मुठा नदीवर असलेल्या पुलावरून वाघोली परिसरातील एका ३१ वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यामध्ये तीन तरुणांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत. या तरूणीवर सध्या एका खाजगी रुगणालयात उपचार सुरु आहेत.
प्रवीण इसावे (वय ३१), विजय गायकवाड (वय ३१) व संजय घुमे (वय ४८ रा. तिघेही कोलवडी, ता. हवेली) असे प्राण वाचविणाऱ्या तिघांची नावे आहेत.
प्रवीण इसावे हे हडपसर या ठिकाणी एका बँकेत उपव्यवस्थापक म्हणून काम करतात. काही कामानिमित्त संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास थेऊर या ठिकाणी गेले होते. यावेळी पुलावर एक मुलगी दिसून आली. तिच्या हालचालीवरून ती उडी मारणार असल्याचे दिसून आले. यावेळी प्रवीण यांनी विजय गायकवाड यांना तत्काळ संपर्क साधून घेऊन आले.
या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता या तरूणीने नदीत उडी मारल्याचे दिसून आले. यावेळी त्या ठिकाणी असणारे संजय घुमे, विजय गायकवाड व प्रवीण इसावे यांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. यावेळी प्रवीण यांनी लोणी काळभोर पोलिसांना तत्काळ संपर्क साधला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय जाधव, संतोष गायकवाड, लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सालके व स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तरुणीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
पोहायला तरबेज नसतानाही पाण्यात उडी..
संबंधित तरूणीने उडी मारल्याचे दिसल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता प्रवीण इसावे यांनी पाण्यात उडी मारली. ते पोहण्यात जास्त तरबेज नाहीत. तरीही केवळ तरुणीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. दोघांनी पाण्यात उड्या घेऊन तरुणीला बाहेर काढले तर संजय घुमे यांनी मुलीला पाण्यातून वर घेण्यासाठी मदत केली. तिघांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका तरुणीचे प्राण वाचू शकले आहेत. या तिघांवर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.