लोणी काळभोर, (पुणे) : घराच्या बाहेर बसवलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केली जाते. अशी छुप्या पद्धतीने होणारी वीजचोरी रोखण्यासाठी लोणी काळभोर येथील ‘महावितरण’कडून एक नवीन मोहीम आखण्यात आली आहे. घराच्या भिंतीवर बसविण्यात आलेले मीटर काढून ते चौकातील विद्युत खांबावर मोठ्या पेटीत “सील’बंद करण्यात येत आहेत, अशी माहिती लोणी काळभोर शाखेतील महावितरणचे मुख्य सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांनी दिली.
सध्या अनेक ठिकाणी मीटर रीडिंग चुकीची आहे. अवाच्या सव्वा वीज बिलांच्या तसेच वीज चोरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. वीज चोरी, चुकीचे रीडिंग, बिलांच्या तक्रारीसाठी महावितरणने अनेकदा मोहीम राबवल्या. परंतु, या तक्रारीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी “महावितरण’कडून संबंधित भागातील वीज ग्राहकांचे मीटर त्यांच्या घराऐवजी विद्युत खांबावर बसवण्यात येणार आहेत. यामुळे बऱ्याच तक्रारींचे निवारण होणार आहे. तसेच वीज चोरीही होणार नाही. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोणी काळभोर व परिसरात वाढत्या वीज गळतीवर मात करण्यासाठी महावितरण कंपनीने विद्युत पोलच्या खांबावर मल्टीमीटर बॉक्स बसविण्याचा निर्णय घेतला असून एका बॉक्समध्ये १२ मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अनेक भागांतील ग्राहकांचे घरातील वीज मीटर मल्टीमीटर बॉक्समध्ये बसविण्यात आले आहेत. एका मल्टीमीटर बॉक्समध्ये सुमारे १२ मीटर बसविण्यात येत असून या बॉक्सची चावी महावितरणच्या टेक्निशयनकडे किंवा मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीकडे देण्यात आली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर व परिसरात वीज मीटरमध्ये फेरफार करणे, आकडे टाकणे, चुंबकीय पद्धतीचा वापर करून मीटरचा वेग कमी करणे अशा विविध प्रकारातून वीज चोरी केली जाते. वीज चोरीला आळा बसावा म्हणून वीज खांबांवर सरासरी तीन ते चार फूट लांबीच्या संरक्षित पेटीत दहा ते बारा मीटर बसविले जातात. मीटरच्या देखभालीची जबाबदारी त्या-त्या भागातील सहकारी अधिकाऱ्यांवर दिलेली आहे. संबंधित ग्राहकाचा मीटर क्रमांक तपासून दरमहा रीडिंग घेतले जाईल. नंतर संबंधित ग्राहकास बिल दिले जाईल. संरक्षित पेटीला लॉकही असेल. ऊन, वारा, पावसातही पेटी सुरक्षित राहणार आहे.
बारा घरांचे मीटर एकाच ठिकाणी..
मीटरमधील फेरफार रोखण्यासाठी घराच्या भिंतीवर असलेले मीटर काढून कॉलनीतील चौक किंवा रस्त्यावरील वीज खांबावर मोठ्या पेटीत मीटर लावण्यात येणार आहेत. मोठ्या आकाराच्या या पेटीत बारा घरांचे मीटर लावून पेटी सील बंद केली जाणार आहे. पेटीला पारदर्शी दरवाजा असल्याने मीटर रीडिंग घेणे देखील सोयीचे ठरणार आहे. या ठिकाणाहून सर्व्हिस वायरद्वारे वीजपुरवठा घरात जोडण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना अभियंता रामप्रसाद नरवडे म्हणाले, “कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरात ७० ते ८० बॉक्स बसविण्यात आले आहेत. तसेच लवकरच लोणी काळभोर व परिसरातील वीज मीटर विद्युत खांबावर लावले जाणार आहेत. एका विद्युत खांबावरून १२ ते १५ ग्राहकांना वीजपुरवठा दिला जातो. यामुळे या सर्वांचे मीटर विद्युत खांबावर लावण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, तसेच यामुळे ग्राहकांच्या तक्रारीही कमी होतील. तसेच वीज चोरीवरही आळा बसणार आहे.”