Loni Kalbhor : लोणी काळभोर : परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुचाकीवरुन जाताना कट मारल्याचा जाब विचारल्याने चौघांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच कदमवाक वस्तीत इंदिरानगर चौकात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरूद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कदमवाक वस्ती येथे थरार
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या घटनेबाबत मनोज दिलीप मोरे (वय २४, रा. इंदिरानगर, कदम वाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Loni Kalbhor) मोरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रथमेश अहिरे (रा. सिंद्राममळा, लोणी काळभोर), प्रणव भारत सिरसाट (रा. कदमवाक वस्ती), अभिजित अभिमन्यू आहेरकर (रा. लोणी काळभोर) आणि अभिषेक दत्तात्रय रामपुरे (रा. लोणी काळभोर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कदमवाक वस्तीत इंदिरानगर चौकात सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश अहिरे व प्रणव सिरसाट हे दोघे फिर्यादीच्या परिचयाचे आहेत. आरोपींनी फिर्यादीला दुचाकीचा कट मारला. (Loni Kalbhor) त्यावर फिर्यादी यांनी कट का मारला? असा जाब विचारला. हाच राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला कोयत्याने मारहाण केली. तसेच परिसरात दहशत निर्माण केली.
याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक गोरे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.