विशाल कदम
लोणी काळभोर : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने दीड-दोन वर्षांपासून अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना चांगलाच भाव आला असून, नेते व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत असताना दिसत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्येचे वातावरण होते. नेते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारही विचारत नसल्याने कार्यकर्ते जवळपास गायब झाले होते. आता लोकसभेच्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांनी सुगीचे दिवस येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कामाला येणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित झालेल्या कार्यकर्त्यांची आठवण नेत्यांना होत आहे.
सुख-दुःखाच्या प्रसंगात नेतेमंडळी आता आवर्जून हजेरी लावत आहेत. इच्छुक उमेदवार प्रकाशझोतात राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत आहेत. याचबरोबर लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपल्याच पक्षाला अथवा गटाला उमेदवारी मिळावी, यासाठी कंबर कसली आहे. त्यात दावे, प्रतिदावे केले जात आहेत.
साखरपुडा आणि लग्न सोहळ्यास पुढारी आणि नेतेमंडळींची गर्दी वाढली आहे. लग्नाचा मुहूर्त साधताना पुढाऱ्यांची दमछाक होत आहे. लग्नाचा मुहूर्त चुकला, तरी लग्न सोहळ्यास हजेरी लावण्याकडे कल वाढला आहे. दशक्रिया विधीसाठी गर्दी वाढली आहे. एरवी कोणाचे निधन झाले, याकडे लक्ष न देणारे नेते सांत्वन करण्यासाठी सर्वसामान्यांच्या घराचा उंबरा चढत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी विविध उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत.
महायुती, महाआघाडीतील नेते झाले ‘ॲक्टिव्ह’
सद्यःस्थितीत नगरपालिका निवडणुका नसल्या, तरी लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन्ही बाजूचे नेते ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत. महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तालुका पातळीवर ॲक्टिव्ह झाले आहेत. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते, पदाधिकारी एकत्रित विविध कार्यक्रमांना हजेरी लावून वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील राजकारण तापत आहे.
‘निष्ठावंत’ शब्द कोणाला वापरायचा हा प्रश्नच
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बदललेल्या राजकीय विचारसरणीमुळे निष्ठावंत हा शब्दच आता कोणासाठी वापरायचा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण सत्ता, निवडणूक आणि पैसा या एकाच विचाराने सगळेच पक्ष निवडणुकीचा विचार करत आहेत. त्यामुळे पक्षाची ध्येयधोरणे ही कुठेतरी बाजूला ठेवून निवडणूक जिंकण्याचा विचार पक्ष करत आहेत.
आयात उमेदवाराला संधी असल्याने निष्ठावंतांची नाराजी
पूर्वी पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्या अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष उमेदवारी द्यायचा; परंतु, सध्या जिंकून येण्याची शक्यता आणि आर्थिक स्थिती पडताळून दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवाराला प्राधान्य देऊन आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांची ससेहोलपट होताना दिसत आहे.
‘कोणता झेंडा घेऊ हाती?’; कार्यकर्त्यांना पडतो प्रश्न
निवडणूक प्रचारात आपल्या पक्षाची भक्कम बाजू मांडण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जाते. पूर्वी तन-मन-धनाने आणि हिरीरीने कार्यकर्ते आपल्या नेत्याचा व पक्षाचा प्रचार करायचे; परंतु आता नेतेच पक्षांतर करत असल्यामुळे कार्यकर्त्यांसमोर कोणता झेंडा घेऊ हाती? हा प्रश्न पडला आहे.