लोणी काळभोर (पुणे) : राखी पौर्णिमेनिमित्त लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या राख्या विक्रीस आल्या आहेत. भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेल्या राखीपौर्णिमेची बाजारपेठ सजली असून, राखी खरेदीसाठी महिलांची, युवतींची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.
रक्षाबंधन बुधवारी (ता. ३०) असल्याने राखीचे दुकान महिलांच्या गर्दीने फुलले आहेत. अनेकांना रोजगार मिळाला आहे. ठिकठिकाणी हंगामी व्यावसायिकांकडून राखीचे दुकाने थाटले आहे. तरुणांकडून चारचाकी हातगाड्यांवर राखी विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. काहींकडून फेरी मारून विक्री केली जात आहे. बाजारात काही नव्या प्रकारच्या राख्या आल्या असून, त्या बच्चेकंपनीपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बाजारपेठेतील दुकानांमध्ये विविध रंगी व आकर्षक राख्यांच्या डिझाईन पाहायला मिळत आहेत. दहा रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. रुद्राक्ष, क्रिस्टल, मोरपंख, चंदन, ओम, स्वस्तिक, कलश, मेरे प्यारे भैया आदी नावे कोरलेल्या नवीन राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चांदीचा मुलामा दिलेल्या राख्या पन्नास ते दीडशे रुपयापर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत.
दरम्यान, राख्यांच्या पारंपरिक स्वरुपात कुठेही बदल न करता त्यात नावीन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण छाप साकारली आहे. साखळी, ब्रेसलेट राख्यांचे अनेक नमुने विक्रीस आहेत. विमान, घड्याळ विविध गाड्यांच्या आकारातील राख्या लक्ष वेधत आहेत. कार्टूनमध्ये मोटू पतलू, छोटा भीम, डोरेमॉन, टेडी बियर, हनुमान, संगीत आणि लायटिंग असलेल्या राख्यासोबत विविध प्रकारातील राख्यांनी येथील बाजारपेठा सजल्या आहेत.
महिला वर्गाची पोस्टात वाढली वर्दळ..
याबाबत बोलताना लोणी काळभोर येथील पोस्ट मास्तर अवंती उगले म्हणाल्या, ‘‘घरापासून दूर असणाऱ्या भावाला राखी पाठवण्याची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. लोणी काळभोर येथील पोस्ट कार्यालयात भावांना राख्या पाठविण्यासाठी पोस्टात व्यवस्था करण्यात आली आहे. राख्या पाठवण्यासाठी पोस्ट कार्यालयात महिला वर्गाची वर्दळ वाढली आहे. यासाठी पोस्टाने व्यवस्था केली आहे.’’
याबाबत बोलताना विक्रेते सचिन (लाला) अडागळे म्हणाले, ‘‘पूर्वी अशा प्रकारचे ब्रेसलेट बाजारात विक्रीस येत होते. राखीच्या स्वरूपात प्रथमच विक्रीस आले आहे. त्यामुळे आकर्षण ठरत आहे. त्यापाठोपाठ रुद्राक्ष आणि मोती राखीस मोठी मागणी आहे.’’
राखी प्रकार दर
मोती राखी १० ते २००
क्रिस्टल १० ते ५०
रुद्राक्ष राखी १० ते १००
लुंबा राखी १० ते ५०
चांदीची राखी ५० ते २००
ब्रेसलेट राखी ५० ते २००
कार्टून राखी १० ते ५०
लायटिंग राखी ५० ते १००
देव राखी ०५ ते ४०
पुष्पा राखी १० ते ५०
ईव्हील आय राखी २८