लोणी काळभोर : पुणे वनपरिक्षेत्रातील लोणी काळभोर (ता. हवेली) येथील वनक्षेत्रासाठी राखीव गटातील एकूण १८७ हेक्टर आर पैकी ३.४७ हेक्टर आर इतक्या राखीव वनक्षेत्रावर स्थानिकांनी बेकायदा घरे बांधून तसेच शेतीसाठी जागेचा वापर करून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांवर वनखात्याने धडक कारवाई करून, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे नष्ट करून, गट क्र. ११६२ मधील एकूण ३.४७ हेक्टर आर. राखीव वनक्षेत्र मोकळे केले.
याबाबत मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात २७ जून २०२३ रोजी रितसर वन गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत संबंधितांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली होती. तरीही वनजमिनीवरील अतिक्रमण न काढल्याने ७ नोव्हेंबर रोजी अतिक्रमित वनक्षेत्राच्या हद्दी निश्चित करुन, अतिक्रमित क्षेत्रात लावण्यात आलेले चवळी, ऊस, कांदा व फुले इत्यादींची शेती जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केली व त्याठिकाणी पुन्हा शेतीचे अतिक्रमण होऊ नये या उद्देशाने जेसीबीच्या सहाय्याने चारी मारुन घेतल्या. अतिक्रमित क्षेत्रातील दोन घरांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करुन, ११६२ मधील एकूण ३.४७ हेक्टर आर. राखीव वनक्षेत्र रिकामे करुन घेतले.
ही कारवाई पुण्याचे मुख्य वनसंरक्षक (प्रा.) एन. आर. प्रविण व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली. कारवाईमध्ये वनपाल मंगेश सपकाळे, वैभव बाबर, विशाल यादव, सिमा मगर तसेच वनरक्षक अंकुश कचरे, मधुकर गोडगे, संजीव कांबळे, अशोक गायकवाड, पांडुरंग भिकणे, पूजा कबुल, श्रीराम जगताप, संभाजी गायकवाड, राजकुमार जाधव, चंद्रकांत शिंदे, संगिता कल्याणकर, प्रिती नागले, वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी सहभागी झाले होते.