जनार्दन दांडगे
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर येथे लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघाताची खूप मोठी दुर्घटना शुक्रवारी (ता.३०) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास टळली आहे. यामध्ये २ लहान मुले, तीन पुरुष आणि दोन महिला असे एकूण ७ जणांचे प्राण वाचले आहेत.
यामुळे लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अनिल गायकवाड, पोलीस नाईक हनुमंत करचे व महिला पोलीस मनीषा नरवडे यांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथील एक कुटुंब मुंबईच्या दिशेने होंडा अमेझ गाडीने जात होते. पुणे-सोलापूर महामार्गाववरून पुण्याच्या दिशेने कार असताना, त्यांची कार एमआयटी कॉर्नर येथील चौकात आली. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, आणि कार कंटेनरला जोरदार धडकली आणि कार रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी येऊन थांबली.
पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच असते. मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी लोणी स्टेशन आणि एमआयटी कॉर्नर चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे. वाहतूक पोलीस कर्त्यव्य बजावीत असताना, भीषण अपघात झाला.
यावेळी पोलिसांनी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या होत्या. यादरम्यानच कार रस्त्यावर आल्याने, खूप मोठी दुर्घटना टळली. व दैव बलवत्तर असल्याने कारमधील ७ जणांचे प्राण वाचले.
दरम्यान, लोणी काळभोर वाहतूक पोलिस पोलीस हवालदार अनिल गायकवाड, पोलीस नाईक हनुमंत करचे व महिला पोलीस मनीषा नरवडे यांच्या सतर्कतेमुळे कारमधील ७ जणांचे प्राण वाचले आहे. यामुळे लोणी काळभोर वाहतूक पोलिसांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अनिल गायकवाड म्हणाले की, एमआयटी कॉर्नर येथील चौकात एमआयटीकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने सोडावत असताना, सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चाललेल्या एका कारचा अपघात झाला. कार पुण्याकडून सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावर घसरत आली. आणि रस्त्याच्या मध्यभागी थांबली. याचदरम्यान, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी जर वाहतूक सुरु असती, तर कारचा अजून मोठा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने वाहतूक कोंडी सोडविताना दाखविलेल्या सतर्कतेमुळे ७ नागरिकांचे प्राण वाचले आहे. त्यामुळे मला कर्त्यव्य बाजाविल्याचा अभिमान वाटत आहे. असे गायकवाड यांनी बोलताना सांगितले.