उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. हा अपघात उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात गुरुवारी (ता.७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. यात कोरेगाव मुळ येथील एक जण गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मोहन राजाराम वरघट (वय ४९, रा. मानसरोवर कोरेगाव मुळ, ता. हवेली, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहन वरघट हे महावितरण विभागात प्रधान तंत्रज्ञाचे काम करत आहेत. तर स्वप्नील राजेंद्र ताम्हाणे (वय ३७, मु.पो. ताम्हाणवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे) असे किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन वरघट हे महावितरणाच्या उरुळी कांचन शाखा क्र.२ मध्ये प्रधान तंत्रज्ञ म्हणून काम करत आहेत. तर स्वप्नील ताम्हाणे यांचे खेडेकर मळा परिसरात गाड्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मोहन वरघट हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता.७) अष्टापूर परिसरात काम करण्यासाठी गेले होते. संध्याकाळी कामावरून सुट्टी झाल्यानंतर वरघट हे पुणे-सोलापूर महामार्गावरून कोरेगाव मुळकडे विरुद्ध दिशेने चालले होते. तर स्वप्नील ताम्हाणे हे दुकान बंद करून घरी चालले होते.
दरम्यान, या दोघांच्या दुचाकींची खेडेकर मळा परिसरात गुरुवारी (ता.७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक झाली. या अपघातात दोघेही जखमी झाले. वरघट यांना तातडीने सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये तर ताम्हाणे यांना विठ्ठल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वरघट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
वरघट यांच्यावर शस्त्रक्रिया, प्रकृती चिंताजनक
वरघट यांच्या डोक्यातून जादा रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या डोक्यावर शुक्रवारी (ता.८) शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ताम्हाणे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.