युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे सायंबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भीर्र…झाली…उचल की टाक सेंकद
बारा असा आवाज घूमता होता. या बैलगाडा शर्यतीमध्ये १५० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला होता. अशी माहिती
माजी सरपंच बबनराव पोकळे यांनी दिली.
सकाळी देवाला अभिषेक व हारतुरे नी सुरूवात करण्यात आली होती. यानंतर गावातून काठीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत लेझीम खेळावर विविध कसरती करून दाखविला. या यात्रेला गावातून सवाद्य मिरवणुकीने सुरूवात झाली. पोकळे, पोळ व पळसकर या पाठोपाठ ग्रामस्थांनी सहभाग दाखवला.
दुपारी बैलगाडा घाटात बैलांच्या शर्यती आयोजीत करण्यात आल्या होत्या. परीसरातून बैलगाडा मालक व शौकीनांनी या घाटात गर्दी केली होती. ज्ञानेश्वर मुळे यांनी या घाटात समालोचन केले. या यात्रेसाठी लहान लहान व्यवसायीकांनी गर्दी केली होती. फळीफोड गाडा म्हणून सुनिल मारूती वागदरे तर घाटाचा राजा लक्ष्मण जाधव यांनी मान पटकावला. शाकाहारी जेवनाच्या जेवनावळीचा आनंद भावीक व बैलगाडा मालकांनी घेतला.
दरम्यान, मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री शोभेचे दारूकाम करण्यात आले. त्यावेळी छबीना
काढण्यात आला होता. रात्री मालती इनामदार या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम
गावामध्ये झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.