पुणे : अवसरी खुर्द (आंबेगाव) येथे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची प्रचिती एका शेतमजूर दाम्पत्याला आली. दोन वर्षाच्या लहान मुलाने बिबट्याला कुत्रे समजून आई-वडिलांना भू भू (श्वान) आहे म्हणून दाखवले आणि आई-वडिलांचा बिबट्याला पाहून थरकाप उडाला. तात्काळ लहान मुलाला उचलून पळून बाजूला गेले. उन्हाळ्यामुळे सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सर्वत्र सरू आहे.
मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेनऊच्या सुमारास अवसरी खुर्द येथील कोसरपट्टी या परिसरात विकास टेमकर यांच्या शेतामध्ये दोन शेतमजूर (पती-पत्नी) बाजरीची तोडणी करत असताना त्यांच्याबरोबर त्यांचा दोन वर्षाचा लहान मुलगा देखील होता. बाजरी तोडणी करत असताना लहान मुलांनी वडिलांना सांगितले की, पाठीमागे मागे भू भू आहे. वडिलांनी मागे वळून पाहिले असता त्या ठिकाणी बिबट्याचा बछडा व मादी होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पती-पत्नी आपल्या लहान मुलाला उचलून घेऊन लांब पळाले व विकास टेमकर यांना या घटनेची माहिती दिली. टेमकर यांनी वन विभागाला ही माहिती कळवली.
तात्काळ वन विभागाचे वनरक्षक रईस मोमीन, वनरक्षक सी. एस. शिवचरण, बिबट रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर, मिलिंद टेमकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनास्थळाच्या ठिकाणी चारही बाजूने उसाचे क्षेत्र व मधोमध बाजरीचे क्षेत्र आहे. वनरक्षक रईस मोमीन यांनी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावला आहे. रईस मोमीन, सी. एस. शिवचरण यांनी या परिसरातील नागरिकांना सजग राहण्याचे आव्हान केले. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून एकटे फिरू नये व शेती कामे करताना शक्यतो लहान मुलांना घरीच ठेवावे. घरी ठेवणे शक्य नसेल तर आपल्या नजरेसमोरच शेती कामे करताना लहान मुलांना ठेवावे व त्यांना गडद रंगाचे कपडे घालू नये, असे आवाहन नागरिकांना मोमीन यांनी केले.