Leopard : मंचर, (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथे सावजाच्या मागावर असलेला बिबट्या विहरीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे. वन खात्याने तत्परता दाखवत बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावडेवाडी येथील सैद मळ्यातील माजी सरपंच बबन बाबुराव गावडे यांच्या शेतात त्यांचा मुलगा संतोष गावडे हा आपल्या शेताला पाणी देण्यासाठी जात होता. विहिरीतून पाणी वाजल्याचा आवाज आल्याने त्यांनी विहिरीमध्ये डोकावले असता विहिरीत बिबट्या पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. Leopard
बिबट्या हा वीज पंपाच्या दोरीला तग धरून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होता. तात्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी जाऊन रेस्क्यू करण्याबाबत सूचना दिल्या. तत्पूर्वी सरपंच विजय गावडे व ग्रामस्थांनी बिबट्याला वाचविण्यासाठी दोरीच्या साह्याने लाकडी फळी टाकून त्याला सहारा दिला होता.
दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी तसेच अविनाश गावडे, सरपंच विजय गावडे, देवराम गावडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गावडे यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला बाहेर काढण्यात वन खात्याला यश आले आहे. बिबट्याला बाहेर काढताना ग्रामस्थांच्या गर्दीमुळे रेस्क्यू टीम व वनविभागाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.