उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन व परिसरात दिवसा व रात्री बिबट्याचा फेरफटका सुरु झाला आहे. आतापर्यंत बिबट्याने अनेक कुत्र्यांचा व शेळ्या-मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या कुटुंबांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यातच रविवारी (ता. 23) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी बिबट्या पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील टिळेकरमळा परिसरात मागील दोन दिवसांपूर्वी तीन शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला होता. याबाबत अनेक वेळा वनरक्षकांना सांगूनही कोणतेही उपाययोजना केल्या नाहीत. परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने सोयीस्कर गोड बोलून दुर्लक्ष न करता या परिसरात तातडीने पिंजरा लावावा. अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
बिबट्याने अक्षरशः चक्क लोक वस्तीमध्ये येऊन मेंढ्या ठार केल्यामुळे टिळेकरमळा परिसरात मोठी घबराट पसरल्याने दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी शेतामध्ये जाण्यास घाबरत आहेत. शेतमजूर सुद्धा कामाला येण्यासाठी घाबरत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे येथील शेळीपालन, मेंढी पालन करणारा शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. बिबट्या लोकवस्तीमध्ये शिरकाव करू लागला आहे.
दरम्यान, सध्या पावसाचे दिवस असून सर्वच ठिकाणी पेरणीची लगभग सुरु आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुरांना शेतात वखरणी, पेरणी करण्यासाठी जावे लागते. बिबट्याचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे वन विभागाने तात्काळ पिंजरे बसवून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी संदीप (तात्या) कांचन म्हणाले, “शेतात पेरणीची कामे सुरु असल्याने परिसरात सध्या मका, ऊस लागवड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बिबट्यामुळे कामगार शेतमजूर शेतात वखरणी, पेरणी करण्यासाठी घाबरत असून या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.
याबाबत वनअधिकारी मंगेश सपकाळे म्हणाले, ” पिंजरा मागवला आहे. उद्यापर्यत हा पिंजरा सदर ठिकाणी लावण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.