उरुळी कांचन, (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून उरुळी कांचनसह परिसरात बिबट्याचा मुक्तपणे वावर सुरू आहे. मागील महिनाभरापूर्वी टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दोन बकऱ्यांचा फडशा पाडला होता.
रविवारी (ता. ०७) रात्री उरुळी कांचन येथील नवी तांबे वस्ती आणि परिसरात बिबट्या दिसून आल्याने लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील लोकांकडून केली जात आहे.
जंगलामध्ये फिरणारा बिबट्या लोकवस्तीमध्येही आता घुसू लागला आहे. लोकवस्तीमध्ये मोकाट कुत्री पळवणाऱ्या बिबट्याने दोन महिन्यांपासून काही शेतकऱ्यांच्या गुरांसह शेळ्यांवर हल्ला करून त्या मारल्याच्याही घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वळती, शिंदवणे परिसरातील जंगलामध्ये गुरे चारण्यासाठी न्यायची की नाही? असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. शेतामध्ये गेलेल्या गुरांवर हल्ला करणार्या बिबट्याचा लोकवस्तीमध्येही वावर वाढू लागला आहे.
दरम्यान, उरुळी कांचनसह टिळेकरवाडी येथील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा दिवसरात्र मुक्तपणे वावर असतो. त्यामुळे लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दहशत निर्माण करणार्या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
View this post on Instagram