हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनपासून जवळ असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मागील आठ दिवसापासून बिबट्या धुमाकूळ घालत आहे. या बिबट्याने परिसरातील २ ते ३ कुत्री फस्त केल्याची चर्चा सध्या गावात असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मचाले वस्ती येथे काही नागरिकांनी समक्षपण बिबट्या पहिला आहे. या बिबट्याने वस्तीवरील २ ते ३ कुत्री फस्त केली असून या भागात बिबट्याच्या पायाचे ठसे सुद्धा दिसून आले आहेत.
जंगलात अन्न पाण्याची कमतरतेमूळे बिबट्यांचा वावर आता गावांजवळ वाढलेला आहे. गावांजवळ अन्न पाणी मिळत असल्याने बिबट्यांचा गावांजवळ संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून दिसण्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबट्या हा कुत्री, मुंगूस, कोंबड्या, शेळ्या, रेडकं अशा प्राण्यांची शिकार करण्यासाठी मानवी वस्तीत बाहेर पडतो.
शिंदवणे सारख्या डोंगराळ भागाच्या गावात बिबट्या दाखल झाल्याने पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, वळती, तरडे, शिंदवणे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मेंढपाळ व पशुपालन करणार्यांना डोंगरावर गुरे-ढोरे चरण्यासाठी घेऊन जाणे मुश्कील झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने रात्रीचे पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने पिकांना पाणी असूनही पाणी देता येणार नाही.
दरम्यान, या भागातील अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात. त्यांच्यामध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वन खात्याने प्रत्यक्ष पाहणी केली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ मचाले म्हणाले, “शिंदवणे गावात बिबट्याचे दर्शन नागरिकांना मागील आठ दिवसांपासून होत आहे. तसेच परिसरातील वस्तीवर असलेली २ ते ३ पाळीव व भटकी कुत्री या बिबट्याने फस्त केली आहेत. अगोदरच दुष्काळाने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच बिबट्या आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा.”
याबाबत बोलताना वनाधिकारी अशोक गायकवाड म्हणाले, “ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. शिंदवणे परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. ते ठसे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केली आहे. दिवसा सदर ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, तसेच नागरिकांनी एकटे बाहेर पडून नये. तसेच ग्रामस्थांना खबरदार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”