-राहुलकुमार अवचट
यवत : रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना यवत येथे घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून एक बिबट्या रेल्वे आवळाच्या परिसरात फिरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती. आज यवत रेल्वे स्टेशन जवळ पुण्याच्या बाजूकडे एका बिबट्याची रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती यवत रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी वन विभागाला कळवली.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. यवत रेल्वे स्टेशन जवळ भक्ष्याच्या शोधात असताना पुण्यावरून सोलापूर कडे जाणाऱ्या रेल्वे गाडीने जोरदार धडक दिल्याने बिबट्याचे शरीर दोन भागात विभागले गेले असून सदर बिबट्या अंदाजे दहा वर्षाच्या असल्याची माहिती मिळत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
यावेळी वनपाल अंकुश खरात, वनरक्षक शिवकुमार बोंबले, अक्षय शितोळे, ज्ञानदेव भोंडवे, वन कर्मचारी बापू कुदळे उपस्थित होते. मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याचे वनविभागाच्या हद्दीत दहन करण्यात येणार असल्याचे वनपाल अंकुश खरात यांनी सांगितले.
बिबट्या असलेल्या परिसरात पिंजरे लावण्याची मागणी
गेल्या अनेक दिवसांपासून यवत स्टेशन, केडगाव, बोरीपार्धी यासह दौंड तालुक्यातील अनेक भागात बिबट्या असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. या घटनेने या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. वन्य प्राण्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होत असल्याने वन विभागाने बिबट्या असलेल्या क्षेत्रांमध्ये तात्काळ पिंजरा लावावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.