शिरूर: पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असुन अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे दिसून येत आहे. अशातच शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावात शनिवारी 20 एप्रिल रोजी पहाटे चारच्या वाजण्याच्या सुमारास एक बिबट्याची मादी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरासमोर असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. परंतु, बिबट्या खुराड्यात शिरताच कोंबडी बाहेर पळून गेली. त्यानंतर लागलीच शेतकऱ्याने खुराड्याच्या दरवाजा बंद केल्याने बिबट्याची मादी खुराड्यातच बंद झाली.
दरम्यान शिंदोडी गावातील शेतकरी मछिंद्र सोनवणे यांच्या घरासमोर कोंबड्यासाठी बनवललेला एका खुराडा आहे. शनिवार 20 एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेली एक बिबट्याची मादी थेट या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. त्यानंतर कोंबड्या आरडाओरडा करत खुराड्याच्या बाहेर पळून गेल्या. कोंबड्याच्या आवाजामुळे जागे झालेले शेतकरी मछिंद्र सोनवणे हे काय झाले ते पाहण्यासाठी खुराड्याजवळ गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याची मादी कोंबड्याच्या खुराड्यात शिरलेली दिसली. त्यांनी प्रसंगावधान राखत खुराड्याचा दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे बिबट्याची मादी खुराड्यात बंद झाली.
त्यानंतर मछिंद्र सोनवणे यांनी ही गोष्ट शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक विठ्ठल दुर्गे यांना सांगितली. दुर्गे यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करत याबाबत माहिती दिली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चंदन चवणे आणि त्यांचे सहकारी आकाश डोळस, वैभव नेहरकर, शिवाजी मोघे, शिरुरचे वनपाल गणेश म्हेत्रे, वनरक्षक संतोष भुतेकर, वनकर्मचारी दिनेश गोरड, नवनाथ गांधले, संपत पाचुंदकर हे सर्वजण शिंदोडी गावामध्ये आले.
त्यानंतर कोंबड्याच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. बेशुद्ध झाल्यानंतर त्या मादीला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठविण्यात आले. या बिबट्याच्या मादी वय अंदाजे दोन वर्षे असल्याचे यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.