Leopard News : नारायणगाव (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील सहाणे वस्तीजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन वर्षे वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. २८) रात्री एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता ओलांडताना बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याची माहिती कलिंगड ढाबाचे मालक नीलेश आल्हाट व पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती.
मृत बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माणिकडोह येथील निवारा केंद्रात शिवविच्छेदनासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूला बागायती शेती असून डिंभा डावा कालवा, मीना पूरक कालवा व मीना नदी पात्र आहे. भक्ष्य पकडण्यासाठी व पाण्याच्या शोधात रात्रीचे बिबटे बाहेर पडतात. रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक बसून वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो.
दरम्यान, हा भाग बिबट प्रवण क्षेत्र असूनही बाह्य वळण रस्त्याचे काम करत असताना वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था न केल्याने वन्य प्राण्यांचा नाहक बळी जात आहे.