पुणे : पुण्यातील महिला एसटी चालक शीतल शिंदे यांनी बँकेतील मॅनेजरची नोकरी सोडून हातात एसटीची स्टीअरिंग धरली आहे. नागरिकांमध्ये मिसळण्याची आणि प्रवासाचीदेखील आवड असल्याने शीतल शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. पूर्वी बँकेतील व्यवस्थापक ते आता एसटीच्या चालक ही नवी संधी मिळाली आहे. ही संधी नोकरीच्या पलीकडची असून, महिला चालक ही नवी ओळखच माझ्यासाठी चांगली आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यातील शीतल शिंदे यांचे मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशनपर्यंत शिक्षण झाले आहे. त्या ॲक्सिस बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होत्या. बँकेत नोकरी करत असतानाच महिला चालकांच्या एसटीच्या भरतीची जाहिरात पाहिली. त्या निवड परीक्षेत पास झाले आणि बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर प्रशिक्षण २०१९ पासून सुरू झाले आहे.
कोरोना काळात या प्रशिक्षणाला स्थगिती मिळाली होती. मात्र, आता प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. महामार्ग, घाट अशा विविध प्रकारच्या मार्गांवर बस चालविली. अगदी यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबादपर्यंतही फेरी झाली असल्याने आता आत्मविश्वास वाढला आहे. सुरुवातीला हे नक्कीच आव्हानात्मक होते. मात्र, पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. याचा अभिमान आणि कौतुक वाटते. यामध्ये कुटुंबाचाही पाठिंबा मिळाला. याबाबत विशेषतः महिलांच्या प्रतिक्रिया चांगल्या होत्या. ही थाप अधिक प्रोत्साहन देणारी आहे, असे शीतल शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच २०१९ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे महिला चालकांचा महामंडळात समावेश झाला. यामध्ये पुणे विभागातील सहा जणींचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला चालक सहभागी झाल्या आहेत. त्यामधीलच एक महिला एसटी चालक शीतल शिंदे आहेत.
याबाबत बोलताना शीतल शिंदे म्हणाल्या कि, एसटीच्या विविध मार्गांवर जाणाऱ्या महिला वाहकांना स्वच्छतागृहाची समस्या भेडसावते. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात ही समस्या अधिकच जाणवते. मार्गांवर स्वच्छतागृह नसल्याने अनेकदा गैरसोय होते. त्यामुळे महिला चालकांसाठी स्वच्छ स्वच्छतागृह आणि सुस्थितीतील विश्रांतीगृह उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.