पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर कोंढवा परिसरात सोमवारी रात्री वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मण हाके यांनी मद्यसेवन केल्याचा आरोप करुन काही मराठा आंदोलकांनी त्यांना जाब विचारला. या वादामुळे तणाव निर्माण झाला. तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. आता या प्रकरणावरून लक्ष्मण हाके यांनी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
यावेळी बोलताना हाके म्हणाले की, याच्यामागे कोण आहेत? तर ते कोल्हापूरचे संभाजी भोसले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यांनी माझ्या अंगावर माणसं घातली. आम्ही त्यांना राजा म्हणणार नाही. महाराष्ट्रातल्या एका ओबीसीच्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरावरती हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो? हे राज्य कायद्याचे राज्य आहे. इथे लोकशाही आहे. राजेशाही कधीच संपली आहे. त्यामुळे आम्ही असलं कोणाला मानत नाही, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
माझ्यावर दारू पिल्याचा तुम्ही आरोप केला आहे. मी त्याच वेळी पोलीस स्टेशनला येऊन प्रेस दिली आहे. मी माझे रक्ताचे नमुने दिले, युरीन टेस्ट दिली. तुमच्यासारखा असतो तर मी कधीच पळून गेलो असतो. पण हा मेंढपाळाचा, धनगराचा पोरगा आहे. ओबीसीची लढाई कुठेही अर्ध्यावर सोडणार नाही. तुम्हाला तर अजिबात घाबरणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी जीवाची कुर्बानी दिली. हे भेकड आहेत. यांच्यात हिंमत असती तर एकटे माझ्यासमोर आले असते, असा हल्लबोल हाके यांनी यावेळी केला आहे.
लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले की, ते ओबीसी आंदोलनाच्या लढाईत ठाम आहेत आणि कोणत्याही प्रकारे दबावाखाली येणार नाहीत. ते म्हणाले, “संविधानाची भाषा बोलणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी ही लढाई सोडणार नाही.”
दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्यात आंदोलकांनी हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली. यावेळी पोलीसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद थोडासा शांत झाला. यावेळी लक्ष्मण हाके यांनी या घटनेवर नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रकार त्यांच्याविरुद्ध एक पूर्वनियोजित कट असल्याचे दिसत आहे.