थेऊर : नव्यानेच तयार झालेल्या लोणी काळभोर येथील मंडल अधिकारीपदी लक्ष्मण बांडे यांची तर बहुचर्चित असलेल्या थेऊर (ता. हवेली ) येथील मंडल अधिकारीपदी किशोर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी लोणी काळभोर येथील अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. लक्ष्मण बांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेत यापूर्वी कार्यभार सांभाळला आहे. तर किशोर जाधव यांनी यापुर्वी हवेली तहसील कार्यालयात कुळ कायदा शाखा व आर. टी. एस. विभागात प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेत आपल्या कार्यतत्परतेची छाप उमटवलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतेच तलाठी व मंडल अधिकारी यांच्या जिल्ह्यातील बदल्या केल्या आहेत. यापुर्वी तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रांताधिका-यांना होते. मात्र, तलाठ्यांच्या बदल्यांमध्ये अनेक तक्रारी येत होत्या. त्यातच काही जणांनी मॅट न्यायाधिकरणात धाव घेतली होती. त्यामुळे शासनाने तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रांताधिकारी यांचेकडून काढून घेत जिल्हाधिका-यांना दिलेले आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या नवनियुक्तींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, शिंदवणे येथील तलाठी प्रदीप जवळकर यांची मुळशी तालुक्यातील कासारसाई या सजावर बदली झाली आहे. तर नायगाव येथील तलाठी निवृत्ती गवारी यांची खेड तालुक्यातील चाकण येथे तलाठी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. लोणीकंद येथील तलाठी गणेश सासणे यांची मुळशी तालुक्यातील भुकूम तलाठी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.