पुणे : जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करताना अनेकदा नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. काही वेळी एकच जमिनीचा व्यवहार दोन ते तीन व्यक्तींसोबत झाल्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर भूखंड घेण्यास इच्छुकांसाठी एक खुशखबर आहे. भूखंड खरेदी करताना नागरिकांना संबंधित जमिनीची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रेडीरेकनर दर अधिक वास्तवदर्शी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, हे संकेतस्थळ जानेवारी २०२४ पर्यंत नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAS) आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, नोंदणी विभागाला राज्यभरातील गावांचे नकाशे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना जमिनींची माहिती मिळणार असून, नोंदणी विभागाला चालू बाजार मूल्यदर (ReadyReckoner) ठरवितानाही याचा फायदा होणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि एमआरसॅक यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार, एक नवे संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर एमआरसॅककडून प्राप्त नकाशे अपलोड करण्यात येत आहेत. राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांचे विकास आराखडेही जोडण्यात येत आहेत. त्यामध्ये शहरी, ग्रामीण आणि प्रभावक्षेत्रातील जमिनींची विभागणी करण्यात येणार आहे. ज्या जमिनीची माहिती हवी आहे, त्या नकाशावरील कळ दाबल्यानंतर जमिनीची सर्व माहिती मिळणार आहे.
दरम्यान, वाशीम, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी, नागपूर विभागातील गडचिरोली आणि गोंदिया, नाशिक विभागातील नगर, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि नाशिक, तर पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचे नकाशे नव्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. उर्वरित जिल्ह्यांच्या नकाशांवरही काम करण्यात येत आहे, असेही नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक) देशमुख यांनी सांगितले.
मालमत्तेचे अचूक स्थान शोधणे शक्य
या सुविधेमुळे खरेदी-विक्री व्यवहारांत अधिक पारदर्शकता येणार आहे. याशिवाय नोंदणी विभागाला दरवर्षी रेडीरेकनर दर जाहीर करताना या संकेतस्थळाची मदत होणार आहे. हे संकेतस्थळ केवळ नागरिकांना माहितीस्तव उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायदेशीर उद्देशासाठी या संकेतस्थळाचा वापर करता येणार नाही, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख यांनी सांगितले. या संकेतस्थळावर शहर, ग्रामीण आणि प्रभावक्षेत्रातील मालमत्ता, जमिनींचे नकाशे, जमिनीचा प्रकार, मालमत्तेचे क्षेत्र, नकाशावर मालमत्तेचे अचूक स्थान शोधणे आणि चालू बाजारमूल्य (ReadyReckoner) आदी विविध माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.