लोणीकंद, (पुणे) : या भागात कन्स्ट्रक्शनची कामे आमच्या शिवाय कोणीच करीत नाही, तुम्ही कसे काय काम सुरु केले? थांब गाडीतुन कोयता घेवुन यांना मारुनच टाकतो, अशी धमकी देऊन ९ जणांनी तिघांना बांबूने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य दिलीप सातव, (वय २५), रोहित शिंदे व सागर सातव पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही, अशी मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी चैतन्य दिलीप सातव यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून महेश गोरख सातव, (वय – ३८), कुशाल गोरख सातव (वय- ३३), विशाल गोरख सातव, (वय – ३०) नाना हारगुडे, (वय – ४०), सुशांत हारगुडे, (वय २७), रा. सर्वजण केसनंद, ता. हवेली) व आणखी चौघेजण (नाव व पत्ता माहिती नाही), अशा नऊ जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सातव व रोहित अंबर शिंदे, रा. वडगावशेरी पुणे यांचा पार्टनरशिपमध्ये कन्स्ट्रक्शनचा व्यावसाय असुन तो श्रीस्वामी समर्थ इंटरप्रायझेस या नावाने आहे. त्यांचे ग्राहक दत्तात्रय भगवान कुडके यांच्या मालकीच्या केसनंद येथील प्लॉट विकसित करणेसाठी दिला होता.
ठरलेल्या कराराप्रमाणे रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सकाळी पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास रामप्रतिविर सदर प्लॉटचे काम करणेसाठी भुमी पुजन करणे असल्याने व पाया खोदाई चे काम सुरु केले. यावेळी मित्र रोहित शिंदे, जागेचे मालक दत्तात्रय भगवान कुडके यांच्यासह त्यांचे कुटुंब, मित्र सागर एकनाथ सातव व पांडुरंग वारघडे असे पुजा करीत होते.
भुमी पुजनची पुजा करीत असताना इसम महेश सातव, कुशाल सातव, विशाल सातव, नाना हारगुडे, सुशांत हारगुडे, व इतर ४ साथीदारांसोबत तेथे आले आणि आम्हाला म्हणाले की, “या भागात कन्स्ट्रक्शनची कामे आमच्या शिवाय कोणीच करीत नाही, तुम्ही कसे काय काम सुरु केले?” असं म्हणत शिवीगाळ केली.
तसेच साईटवर पडलेला बांबु घेवुन महेश सातव व कुशाल सातव यांनी बांबुने हातावर, पायावर मारून जखमी केले. यावेळी बरोबर असलेला मित्र रोहित शिंदे व सागर सातव हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता, कुशाल सातव याने दोघांनाही लाथा बुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली.
दरम्यान, विशाल सातव याने “थांब गाडीतुन कोयता घेवुन येतो आणि यांना मारुनच टाकतो,” अशी धमकी दिली. त्याचे सोबतचे इतर ४ साथीदार असे ३० ते ४० वयोगटातील साथीदारासह बेकायदेशिररित्या एकत्र येवुन अंगावर धावुन येवुन शिवीगाळ केली. मारहाणीत जखमी झालेल्या सताव यांना पुढील उपचारासाठी वाघोली येथील प्राथमिक आरोग्य येथे औषधोउपचार केला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.