पुणे : मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा मोर्चा थेट पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मंगळवारी (ता.२४) धडकला. कोतवाल संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. यावेळी संघटने राज्याध्यक्ष नामदेव शिंदे, विभागीय अध्यक्ष प्रवीण घुले, पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस संतोष कुटे, हवेली तालुकाध्यक्ष प्रवीण सोनवणे, गणेश पवार, चंद्रकांत हुलावळे, सुरेश शेलार, अब्दुल शेख, नितीन कदम, शरद काळे, बाळासाहेब घोडे, शेखर खंडागळे, किरण सावंत, सोमनाथ कालतेर, आर्यन भडलकर, राजेंद्र भागवत, चंद्रकांत बनकर, वैभव आल्हाट आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोतवाल संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री, महसुलमंत्री यांच्या निर्देशानुसार मंत्रालय स्तरावर कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. ती जलद गतीने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना राज्यभर ‘लक्षवेध’ आंदोलन करणार आहे. यामध्ये जळगाव जिल्हा कोतवाल संघटना व सर्व कोतवाल कर्मचारी सदर आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
कोतवाल संघटनेने मंगळवारी (ता.२४) पुणे जिल्हास्तरावर धरणे आंदोलन केले. उद्या 25 सप्टेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन, तर 26 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे मागण्या पुर्ण होईपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे कोतवाल संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.